पारनेर /प्रतिनिधी,
      पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील खारवाडी येथील ग्रामीण भागातील राजेंद्र भालेराव व चंद्रकांत भालेराव यांनी आपल्या कष्टाच्या व मेहनतीच्या जोरावर ते राष्ट्रीय पातळीवर कार्य करीत असून त्याच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक कार्यात चांगले काम करीत असून त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्र वाढवून इतरांनाही त्याचा लाभ द्यावा असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक विनोद लोंढे यांनी केले. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आश्रमशाळेत भालेराव बंधूंनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ भेट दिलेल्या जल शुद्धीकरण यंत्राचे विनोद लोंढे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, संस्थेचे सचिव रेहान काझी, सरपंच भागाजी गावडे, सुखदेव चितळकर, सुरेश रोहकले, बाबाजी चौधरी, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र व्यवहारे, राजू पथवे, संभाजी ढेकळे, कविवर्य रामदास भालेराव, जितेंद्र शिंदे, कादरभाई शेख, भाऊसाहेब भुसारी, प्राचार्य बापूसाहेब रुपनर, मुख्याध्यापक संदीप महांडुळे आदी उपस्थित होते. 
याप्रसंगी बोलताना विनोद लोंढे म्हणाले की, आश्रमशाळा ढवळपुरी ही जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील एक नावाजलेली आश्रमशाळा आहे. येथील अनेक विद्यार्थी गुणवत्तेच्या जोरावर विविध ठिकाणी उच्च पदावर कार्य करीत आहेत. येथील विद्यार्थ्यांसाठी जलशुद्धीकरण यंत्र भेट देऊन भालेराव बंधूंनी मोठे सामाजिक व पुण्याचे कार्य केले आहे. सायबर सिक्युरिटी मध्ये काम करीत असताना त्यांचे गावाकडे लक्ष आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे.
   पोलीस निरीक्षक समीर बारवकर म्हणाले ढवळपुरी हे विस्तीर्ण व दुर्गम भागात येते परंतु येथील लोकांच्या कार्यामुळे ढवळपुरीचे नाव राज्यस्तरावर व राष्ट्रीयस्तरावर गाजत आहे. मोबाईलचा वापर करताना तरुणाईने सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यातले त्यात मुलींनी इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप सारख्या सायबर क्राईम होणाऱ्या गोष्टींकडून सावध राहावे. सरपंच भागाजी गावडे यांनी आपल्या भाषणात ढवळपुरी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेऊन प्रगती करित असून उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच भालेराव बंधूंच्या सामाजिक कार्याचा गावाला फायदा होत आहे असेही ते म्हणाले.
     राजेंद्र भालेराव म्हणाले, आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ जल शुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण करताना खूप आनंद होत आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतूनच आम्ही सामाजिक कार्य करीत आहोत. त्यासाठी आश्रमशाळा व परिसरातील नागरिकांचे खूप सहकार्य मिळते. संस्थेचे सचिव रेहान काझी यांनी प्रास्ताविक केले तर प्राचार्य बापूसाहेब रुपनर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक लतिफ राजे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *