‘महाराजस्व समाधान शिबिर’ लोकहिताचे प्रभावी व्यासपीठ”

पारनेर | ता. प्रतिनिधी ,

शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” पळवे खु. मंडळातील वडनेर हवेली, ता. पारनेर येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले असून, विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना प्रत्यक्ष ठिकाणीच देण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी आमदार काशिनाथ दाते म्हणाले, “महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित असून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी अशा शिबिरांची गरज आहे. तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या बहुतांश समस्या या रस्ते व जमीन विभाजनाशी संबंधित असतात. ‘बळीराजा शेतपानंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबवून या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा शासनाचा प्रयत्न सातत्याने सुरुच आहे. आज राज्य, देश आणि जग झपाट्याने प्रगती करत असताना प्रशासनही तितक्याच वेगाने नागरिकांच्या सेवेत उभे राहिले पाहिजे. शासन व जनतेमधील दरी कमी करून प्रत्येक नागरिकाला न्याय देणे, हीच खरी लोकशाहीची ताकद आहे.”


यासोबतच त्यांनी ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणासोबत नागरिकांच्या होत असलेल्या धावपळीवर व त्यातून त्यांना सामोरे जावे लागत असलेल्या मानस्तापावर उपाय योजना राबविणे गरजेचे असल्याचे सांगताना स्पष्ट केले की, “प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज करून तेथेच डाटा एंट्री ऑपरेटरांना प्रोत्साहन दिल्यास, विविध दाखल्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांना करावी लागत असणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. प्रशासन गावपातळीवर सक्षम होणे ही काळाची गरज असून उद्याच्या काळात त्यादृष्टीने विचार होणे गरज आहे “आजवर अशा शिबिरांत प्रामुख्याने सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण दिले जाते, असे प्रकर्षाने जाणवले असून यापुढे या शिबिरांमध्ये सर्वपक्षीय माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य अशा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेतल्यास शासनाचा मूळ उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य होईल.”


कृषी विभागाच्या कामगिरीचे विशेष कौतुक करताना आमदार दाते सर म्हणाले, “कृषी विभागाने आठशेहून अधिक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले असून, त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जाणवतो आहे. इतर विभागांच्या तुलनेत सर्वाधिक अनुदान वितरित करून शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले कृषी विभागाचे कार्य कौतुकास्पद आहे.”

कार्यक्रमास तहसीलदार गायत्री सौंदाणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, कृषी अधिकारी गजानन घुले, नायब तहसीलदार दिपक कारखिले, सरपंच लहु भालेकर, युवती कार्याध्यक्ष सोनाली कुलथे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विविध लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात थेट लाभ देण्यात आला. रहिवासी, उत्पन्न, जात प्रमाणपत्रे, सातबारा उतारे, रेशन कार्ड, तसेच संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांसारख्या योजनांचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र स्टॉल उभारून नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरणही केले

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
शासनाचे धोरण हे कार्यक्रमांपुरतीच मर्यादित न राहता ती सर्वसामान्यांना आपली वाटली पाहिजे, आपल्यासाठीच शासन वेगवेगळी धोरण राबवतंय हा विश्वास प्रत्येकाच्या मनात जागला पाहिजे. अत्यंत कर्तव्यदक्षपणे व जागरूकतेने आमदार दाते सर संपूर्ण मतदारसंघात काम करत असल्याचा अभिमान असून तालुक्याच्या तहसीलदारांसह सर्वच आयोजकांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल विशेष आभार मानतो.  

– विक्रम कळमकर (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *