पारनेर / भगवान गायकवाड, 
                      विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांच्यातील संशोधक वृत्तीला चालना मिळावी, या उद्देशाने पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच एका भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने वैज्ञानिक प्रयोग सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

                या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यात एकूण २५ नाविन्यपूर्ण प्रयोग, २१ माहितीपूर्ण पोस्टर्स आणि विज्ञानावर आधारित ९ आकर्षक रांगोळ्यांचे सादरीकरण करण्यात आले. रसायनशास्त्र आणि विज्ञानातील विविध क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून अत्यंत सोप्या व प्रभावी पद्धतीने मांडल्या.

                   महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे हे सादरीकरण पाहण्यासाठी पारनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल आणि पारनेर पब्लिक स्कूल येथील १४२ विद्यार्थी व ६ शिक्षक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि पोस्टर्स पाहून शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी मोठे कुतूहल आणि आकर्षण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. उपस्थित शालेय शिक्षकांनीही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि त्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.

              याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, अशा प्रकारची विज्ञान प्रदर्शने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणारी असतात. यातूनच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि प्रयोगशील वृत्ती विकसित होण्यास मदत होते. विज्ञानाच्या माध्यमातून नवोपक्रमाची प्रेरणा मिळते आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील संशोधन क्षेत्रासाठी योग्य दिशा मिळते.

             या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. टी. एस. थोपटे यांनी केले, तर स्वागत समन्वयिका प्रा. व्ही. जी. शेळके यांनी केले. प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून डॉ. एस. एल. कदम आणि डॉ. विजया ढवळे यांनी काम पाहिले.

              याप्रसंगी प्रा. रमेश खराडे, प्रा. ज्योत्सना म्हस्के, प्रा. रामदास घोलप, प्रा. निलेश सोबले, प्रा. शिंगोटे, प्रा. डॉ. दिलीप ठुबे, प्रा. डॉ. सजन खपके, प्रा. डॉ. राहुल डिग्गीकर, प्रा. राणी सोनवणे, प्रा. भाऊसाहेब नरसाळे, प्रा. सागर म्हस्के, प्रा. अनिल ढोले, प्रा. प्रविण डौले, प्रा. अश्विनी ठुबे, प्रा. दिपाली मगर, प्रा. विजया झावरे, प्रा. अपेक्षा लामखडे, प्रा. प्रतिक्षा जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रसायनशास्त्र विभागातील सर्वांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाची सांगता डॉ. एस. जी. कुंडलिकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *