पारनेर / प्रतिनिधी,
बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२६ पारनेर शहराच्या नियोजित आणि शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी “विकास योजना पारनेर” ही महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 मधील कलम 31 (1) अन्वये अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या सूचनेनंतर विकास आराखड्याची अंमलबजावणी कायदेशीरदृष्ट्या लागू होणार असून शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे आ. दाते यांनी सांगितले.
या विकास योजनेला शासनस्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. विविध स्तरांवर बैठका, संबंधित विभागांशी समन्वय आणि आवश्यक त्या सूचना यामुळेच ही प्रक्रिया मार्गी लागली आहे.
दि. ४ ते ९ सप्टेंबर २०२५ दरम्यान संबंधित फाईल मंत्रालयात विविध स्तरांवर वेगाने पुढे सरकली. ४ सप्टेंबर रोजी सहसचिव सुलेखा वैजापुरकर यांच्याकडे फाईल पोहोचली. ५ सप्टेंबर रोजी अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी तिची पाहणी केली. ८ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फाईल सादर झाली आणि त्याच दिवशी उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव व्यंकटेश भट यांची भेट आ. दाते यांनी घेतली.
९ सप्टेंबर रोजी अवर सचिव सुधीर शास्त्री यांच्याकडे पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रत्येक टप्प्यावर आमदार दाते सर स्वतः मंत्रालयात उपस्थित राहून पाठपुरावा करत होते. प्रशासकीय स्तरावरील आवश्यक पूर्तता, स्पष्टीकरणे आणि समन्वय वेळेत पूर्ण झाल्यामुळे मंजुरीची प्रक्रिया गतिमान झाली. दरम्यान, दिवंगत नेते अजितदादा पवार यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या योजनेच्या मंजुरीसाठी विशेष विनंती केली होती. दोन महिन्यांत मंजुरी देण्याचा शब्द शिंदे साहेबांनी दिला आणि तो पाळत विकास योजनेला शासनमान्यता मिळाली.
मंजूर विकास आराखड्यातील आरक्षणे, रस्ते, सार्वजनिक सुविधा, सामाजिक व पायाभूत सुविधा यांची तरतूद आता नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहराचा संतुलित आणि सुबक विकास साधता येणार आहे.
पारनेरच्या विकासाचा दीर्घकालीन रोडमॅप निश्चित करणारी ही योजना प्रत्यक्षात येणे हे शहरासाठी ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. आमदार दाते सरांच्या विशेष प्रयत्नांमुळे पारनेर शहराच्या विकासाला कायदेशीर चौकट प्राप्त झाली असून आगामी काळात पायाभूत सुविधा, रस्ते, सार्वजनिक सोयी-सुविधा आणि नियोजित विस्ताराला गती मिळणार आहे.
पारनेरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमदार दाते सरांचा हा पुढाकार निर्णायक ठरणार असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
🔶🔶🔶🔶🔶
पारनेर विकास योजनेला शासनमान्यता मिळणे हा शहरासाठी ऐतिहासिक क्षण आहे. आमदार काशिनाथ दाते सरांनी सातत्याने पाठपुरावा करून ही प्रक्रिया पूर्णत्वास नेली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. या आराखड्यामुळे शहराचा नियोजित विकास होऊन पायाभूत सुविधांना नवी गती मिळेल. नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारा हा निर्णय ठरेल.
– अशोक चेडे, नगरसेवक पारनेर
🔶🔶🔶🔶🔶🔶
विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्याने पारनेरच्या भविष्यासाठी भक्कम पाया रचला गेला आहे. आमदार दाते सरांच्या प्रयत्नांमुळे शहराच्या वाढत्या गरजांना दिशा देणारी कायदेशीर चौकट तयार झाली. आता रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि सामाजिक प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने राबविता येतील. हा निर्णय पारनेरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
– युवराज पठारे, नगरसेवक पारनेर




