पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला असून, दोन दिवसांत दोन महिलांवर हल्ले झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाच्या संथ कारभाराविरोधात बुधवारी पारनेरमधील तरुणांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केले. “येत्या दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा संपूर्ण पारनेर शहर बंद ठेवू,” आंदोलक तरुणांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मागण्यांचा पाढा वाचला. पारनेर शहर व परिसरात तातडीने पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे बसवावेत.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून गस्त तीव्र करावी. पिंजरे आणण्यासाठी लोकांकडे पैशांची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तालुक्यातील सर्व वन कर्मचाऱ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक जाहीर करावेत. पारनेरसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.आंदोलनादरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, “पिंजरा लावण्यासाठी नागपूरहून परवानगी घ्यावी लागते. तसेच विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. गावचे सरपंच मदत करतात, तुम्हीही वाहनांसाठी सहकार्य करा.”अधिकाऱ्यांच्या या उत्तरावर माजी नगरसेवक विशाल शिंदे, भाजपचे कल्याण थोरात, सतीश म्हस्के आणि उपस्थित तरुण चांगलेच संतापले. “बिबट्याचा बंदोबस्त करणे ही वनविभागाची नैतिक जबाबदारी आहे, त्यासाठी लोकांकडे मदत का मागता?” असा प्रश्नांचा भडीमार नेत्यांनी केला.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश खोडदे आणि वकील गणेश कावरे यांनीही वनविभागाच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. वाढत्या दबावानंतर अधिकारी धाडे निरुत्तर झाले होते.आमदार व नगरपंचायतीचा पुढाकार आंदोलनाची दखल घेत आमदार काशिनाथ दाते यांनी वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने पिंजरे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. दुसरीकडे, पारनेर नगरपंचायत प्रशासनानेही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक ठराव वनविभागाला दिल्याची माहिती नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे व पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांनी दिली.
आश्वासनानंतर आंदोलन मागे….
अखेर वनविभागाने पारनेर पब्लिक स्कूल परिसर, सेनापती बापट तलाव आणि समर्थ नगर येथे पिंजरे लावल्याची माहिती दिली. तसेच लवकरच अधिक पिंजरे लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र, दहा दिवसांची मुदत पाळली नाही तर तीव्र आंदोलनाचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.
या आंदोलनात विशाल शिंदे, कल्याण थोरात, सतीश म्हस्के, अण्णा सोबले, अशोक औटी, बबलू दावभट, किशोर आढाव, इंद्रजित देशमुख, विजय दावभट, महेंद्र बोरुडे यांसह शेकडो तरुण उपस्थित होते.
🔶🔶🔶🔶🔶
“पारनेर वन विभागाने बिबट्या पकडण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. दोन महिलांवर हल्ले होऊनही विभाग सुस्त आहे, हे दुर्दैवी आहे.”.
– विशाल शिंदे, माजी नगरसेवक
🔶🔶🔶🔶🔶🔶
“वन विभागाने तातडीने नियंत्रण कक्ष स्थापन करावा. निधीचा प्रश्न आम्ही वनमंत्री आणि लोकप्रतिनिधींकडे मांडू, पण लोकांचा जीव धोक्यात घालू नका.
कल्याण थोरात, भाजप मंडल सरचिटणीस




