स्नेहालय उडान प्रकल्प, ग्रामस्तर यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखण्यात यश….
संगमनेर / प्रतिनिधी,
अहिल्यानगर जिल्ह्यात स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या तत्पर व समन्वयित कारवाईतून दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे. संबंधित दोन्ही मुलींचे वय १७ वर्षे ११ महिने इतके असून त्यांचा विवाह अनुक्रमे २६ व २४ वर्षांच्या पुरुषांशी लावण्याची तयारी सुरू होती. विशेष म्हणजे, रविवारी सुट्टीचा दिवस आणि नुकतीच अक्षय तृतीया संपल्यामुळे अशा प्रकारचे विवाह होण्याची शक्यता अधिक असताना प्रशासन आणि सामाजिक यंत्रणांनी वेळेवर हस्तक्षेप करत ही कारवाई यशस्वी केली. याच कालावधीत अक्षय तृतीयेच्या दिवशी ५ प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून बालविवाह रोखण्यात आले होते, तर संपूर्ण महिन्यात स्नेहालय उडान प्रकल्पाकडे तब्बल ३० बालविवाह प्रकरणांची नोंद झाली आहे.
दिनांक २६ एप्रिल रोजी उडान प्रकल्पाच्या हेल्पलाइनवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी बालविवाह होणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम आणि सामाजिक कार्यकर्त्या सीमा कौर जुनी यांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधत ग्रामसेवक व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तसेच पोलीस हेल्पलाइन ११२ वर माहिती दिली. पहिला विवाह दाढ खुर्द येथे आणि दुसरा संगमनेर खुर्द येथे होणार असल्याचे स्पष्ट झाले. माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचली. पोलीस वाहनाचा सायरन ऐकताच मंडप परिसरात एकच धावपळ उडाली आणि विवाह सोहळा थांबवण्यात आला.
पहिल्या प्रकरणात ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी संग्राम सयाजी चांडे, प्रशासक सतीश कुंडलिक जोशी, पोलीस पाटील भाऊराव सयाजी लोधळे, उपसरपंच राजश्री सुनील जोशी, तसेच ग्रामस्थ व पंचांच्या उपस्थितीत बालविवाह रोखण्यात आला. सुरुवातीला संबंधित कुटुंबीयांनी हा केवळ साखरपुडा असल्याचे सांगून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला; मात्र उडान प्रकल्पाच्या टीमने योग्य कायदेशीर मार्गदर्शन करत अल्पवयीन मुलीचा साखरपुडा देखील बालविवाहास चालना देणारी आणि कायद्यानुसार गुन्हा ठरणारी कृती असल्याचे स्पष्ट केले. परिणामी साखरपुडाही थांबवण्यात आला.
दुसऱ्या प्रकरणात ग्रामसेवक सुनील नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्राम बाल संरक्षण समिती, तिचे अध्यक्ष व सदस्य यांच्या सहकार्याने आणि स्नेहालय उडान प्रकल्पाच्या समन्वयातून बालविवाह रोखण्यात यश आले. दोन्ही घटनांमध्ये स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्थांचा प्रभावी समन्वय हा निर्णायक ठरला.
बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ च्या कलम १६ नुसार बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच ३ जून २०१३ च्या शासकीय परिपत्रकानुसार ग्रामीण भागात ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांना सहाय्य करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरी भागात १८ ऑगस्ट २०१६ च्या परिपत्रकानुसार बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. १० जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करणे बंधनकारक असून, या समितीत सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, शिक्षक, महिला बचत गट सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच किशोरवयीन मुलगा व मुलगी अशा एकूण ११ सदस्यांचा समावेश असतो. या समितीचे प्रमुख कार्य म्हणजे गावातील प्रत्येक बालकाचे संरक्षण सुनिश्चित करणे आणि बालविवाहासारख्या घटनांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करणे.
याशिवाय, स्थानिक पातळीवर अडचणी निर्माण झाल्यास २९ मार्च २०१४ च्या शासन परिपत्रकानुसार स्थापन केलेल्या तालुका बाल संरक्षण समितीकडे प्रकरण संदर्भित करणे आवश्यक आहे. या समितीचे अध्यक्ष तहसीलदार असून सदस्य सचिव बाल विकास प्रकल्प अधिकारी, आणि सदस्यांमध्ये पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी, इत्यादी अशा जबाबदार अधिकाऱ्यांचा या तालुका बाल संरक्षण समिती समितीमध्ये समावेश असतो. या समितीमार्फत स्थानिक पातळीवरील यंत्रणांना सहकार्य मिळते तसेच कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय दबावाला बळी न पडता बालकांचे संरक्षण सुनिश्चित केले जाते. मात्र अनेक ठिकाणी या समित्या केवळ कागदावर अस्तित्वात असून त्यांना प्रत्यक्षात सक्रिय करणे अत्यंत गरजेचे असल्याचे या घटनांमधून अधोरेखित झाले आहे.
स्नेहालय उडान प्रकल्पाच्या मानद संचालिका ॲड. बागेश्री जरंडीकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ स्नेहालय उडान प्रकल्प हेल्पलाइन ९०११०२६४९५, चाईल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा पोलीस हेल्पलाइन ११२ वर संपर्क साधावा. समाजाच्या सक्रिय सहभागातूनच बालविवाहमुक्त जिल्ह्याचे स्वप्न साकार होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
आपला नम्र …
प्रविण कदम
प्रकल्प व्यवस्थापक
स्नेहालय उडान प्रकल्प
मो.9011026495




