मुंगशी गावातच दररोज 4 तास लोडशेडिंग! शेजारील गावांना वीज, मग मुंगशी गावाला ला अंधार का?


पारनेर/प्रतिनिधी:-
पारनेर तालुक्यातील मुंगशी गावात सध्या लोडशेडिंगमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सायंकाळी सहा वाजता वीजपुरवठा खंडित होतो आणि रात्री दहा वाजता पुन्हा सुरू होतो. विशेष म्हणजे, मुंगशीच्या शेजारील वाघुंडे, हंगा, वडनेर हवेली, म्हसणे आणि सुलतानपूर या गावांमध्ये मात्र या वेळेत वीजपुरवठा सुरळीत सुरू असतो.
यामुळे मुंगशी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “फक्त आमच्याच गावात लोडशेडिंग का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सायंकाळचा वेळ हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आणि शेतकरी तसेच कामगारांच्या दैनंदिन कामकाजाचा महत्त्वाचा काळ असताना वीज खंडित होत असल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

 शेजारील गावांना वीजपुरवठा सुरू असताना मुंगशी गावालाच दररोज चार तासांचा अंधार सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याबाबत तात्काळ स्पष्टीकरण द्यावे व समान न्याय द्यावा, अशी मागणी प्रविण करपे यांनी केली आहे.

ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *