पारनेर | प्रतिनिधी,
खामकर झाप मार्गे वडगाव सावताळ येथे राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू करण्यासाठी टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रविंद्र राजदेव यांनी आज पारनेर आगार येथे आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या मार्गावरील बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
या मार्गावर आगारामार्फत बसची ट्रायल घेण्यात आली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही नियमित बससेवा सुरू करण्यात आलेली नसल्याने राजदेव यांनी याबाबत आगार व्यवस्थापकांकडे कारणांची विचारणा केली. तसेच नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ अहिल्यानगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.
यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्या आषाढी एकादशी वारीनिमित्त राज्यभर अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात आल्यामुळे काही मार्गांवरील नियोजनात विलंब झाल्याचे स्पष्ट केले. वारीचा कालावधी संपल्यानंतर खामकर झाप मार्गे वडगाव सावताळ येथे नियमित बससेवा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या मार्गावरील बससेवा सुरू झाल्यास वडगाव सावताळसह परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार असून त्यांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता वारीनंतर ही बस प्रत्यक्षात रस्त्यावर धावण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
तसेच यावेळी खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या गोरेगाव–मुंबई राज्य परिवहन बससेवेचाही मुद्दा रविंद्र राजदेव यांनी उपस्थित केला. या बसला वाशी येथे अधिकृत थांबा नसल्याने ऑनलाइन तसेच आरक्षण केंद्रावर तिकीट बुकिंग करताना वाशी हा पर्याय उपलब्ध होत नाही. परिणामी वाशी परिसरातील प्रवाशांना अनावश्यक गैरसोयीचा सामना करावा लागत असून त्यांना इतर ठिकाणांचे तिकीट काढावे लागते किंवा पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागतो. ही बाब प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीची असल्याचे निदर्शनास आणून देत, गोरेगाव–मुंबई बससेवेला वाशी येथे अधिकृत थांबा मंजूर करून तिकीट आरक्षण व्यवस्थेतही त्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी रविंद्र राजदेव यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली.




