पारनेर / भगवान गायकवाड, 

करंदी गावाच्या आदर्श सरपंच नंदाताई गव्हाणे आणि युवा नेते भास्कर गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करंदी गावातील महिलांसाठी आयोजित ‘स्नेहालय’ अभ्यास व प्रेरणादायी ट्रिप अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद ठरली. या भेटीसाठी करंदी गावातील सुरेखा गोरे, प्रियांका धुमाळ, मनिषा चौधरी, मीरा पुजारी, शोभा गोरे, हमीदा शेख, साधना गोरे, सुमन आतकर, सुवर्णा एकविरे, सुभद्रा क्षीरसागर, माधुरी औटी, दिपाली थोरात, विमल चौधरी, स्नेहालय संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड आदींनी सहभाग घेतला.

     ग्रामीण भागातील महिलांना सामाजिक जाणिवांची ओळख करून देणे आणि त्यांना समाजसेवेची प्रेरणा देणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.या अभ्यास दौऱ्यादरम्यान स्नेहालय जनसंपर्क अधिकारी संगीता सानप यांनी महिलांना स्नेहालय संस्थेच्या विविध प्रकल्पांची इत्यंभूत माहिती दिली. तसेच, गावातील महिलांना संस्थेच्या विविध प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली. या लोकोपयोगी आणि संवेदनशील उपक्रमामुळे महिलांना समाजातील वंचित घटक, एड्स बाधित महिला आणि निराधार बालकांच्या जीवनमानाशी जवळून समरस होण्याची व त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याची मोठी संधी मिळाली.स्नेहालय संचलित विविध प्रकल्पांची मनाला भिडणारी आणि गांभीर्याने विचार करायला लावणारी भावनिक माहिती या ट्रिपदरम्यान महिलांनी आत्मसात केली. या अनोख्या अनुभवाने महिलांच्या सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या असून त्यांच्यामध्ये समाजसेवेची आणि मानवतेची एक नवी भावना निर्माण झाली आहे. आपल्या गावातील महिलांनी अशा प्रकारच्या उपक्रमात सहभाग घेतल्याने त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आहे.

आदर्श सरपंच नंदाताई गव्हाणे आणि युवा नेते भास्कर गव्हाणे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे आणि सामाजिक समजूतदारपणामुळे समाजातील वंचित घटकांना आधार देण्याचे एक अत्यंत उत्तम कार्य या निमित्ताने घडले आहे. स्नेहालय संस्थेचे महान कार्य समाजासमोर प्रभावीपणे पोहोचवल्याबद्दल आणि या संपूर्ण प्रेरणादायी उपक्रमाने यशस्वी आयोजन केल्याबद्दल स्नेहालय संस्थेच्या वतीने आयोजकांचे व सहभागी महिलांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. हा दौरा करंदी गावातील महिलांसाठी एक अविस्मरणीय आणि वैचारिक समृद्ध करणारा अनुभव ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *