शेतकरी मदत केंद्रासह शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन; दुष्काळग्रस्त शेतीची करणार पाहणी
तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांची माहिती

पारनेर | प्रतिनिधी,

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे हे बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता पारनेर तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पारनेर शहरातील शेतकरी मदत केंद्र आणि शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून, तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती शिवसेनेचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी दिली.

पारनेर तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. पाणीटंचाई, शेतीचे नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या दौऱ्याच्या माध्यमातून केला जाणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या पारनेर आगमनानिमित्त शिवसैनिकांच्या वतीने जोरदार स्वागताची तयारी करण्यात येत आहे. या दौऱ्यात शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. श्रीकांत पठारे यांनी केले आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 युवासेनेकडून दौऱ्याची जय्यत तयारी….

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या वतीनेही जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्यात ते शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीही जाणून घेणार आहेत. दौरा यशस्वी करण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख निलेश खोडदे आणि युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *