पारनेर / भगवान गायकवाड, 
पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन (PTMPA) आयोजित पारनेर डॉक्टर्स प्रिमियर लीग – पी डी पी एल २०२५ क्रिकेट स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात आणि रोमांचक वातावरणात झाला. डॉक्टरांच्या या भव्य क्रिकेट लीगमध्ये दिवसभर उत्कंठावर्धक सामने रंगले. कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून डॉक्टरांनी मैदानात उतरून आपला खेळाडूवृत्तीचा परिचय दिला.स्पर्धेतील सहभागी संघ यावर्षीच्या स्पर्धेत एकूण पाच संघांनी सहभाग घेतला होता.पारनेर टायगर्स, निघोज सुपर किंग,टाकळी चॅलेंजर्स, भाळवणी वॉरियर्स, सुपा अव्हेंजर
दिवसभर रंगलेल्या या सामन्यांमध्ये खेळाडूंची जिद्द, त्यांचा उत्साह आणि सांघिक एकजूट यांचा प्रत्यय आला. प्रत्येक संघाने विजेतेपदासाठी कसून मेहनत घेतली, ज्यामुळे प्रेक्षकांना क्रिकेटचा थरार अनुभवता आला.स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. या अंतिम लढतीत भाळवणी वॉरियर्स संघाने जबरदस्त आणि अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले.

दुसरीकडे, ढोकेश्वर चॅलेंजर्स संघानेदेखील विजेत्या संघाला कडवी झुंज दिली आणि उत्कृष्ट लढत देत उपविजेतेपद (रनर-अप) मिळवले. भाळवणी वॉरियर्सच्या खेळाडूंनी दाखवलेला संयम आणि निर्णायक क्षणी केलेली कामगिरी त्यांच्या विजयाची गुरुकिल्ली ठरली.

सामन्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. याप्रसंगी डॉ. पंकज मते, डॉ. गणेश मिसाळ, डॉ. ईश्वर कणसे, डॉ. अमोल कासवा, डॉ. मुकुंद विधाते आणि डॉ. अविनाश गाडेकर यांच्या शुभहस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष डॉ. संदीप औटी, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र वाकळे, सचिव डॉ. पांडुरंग थोरात, सहसचिव डॉ. सुशील पादीर, खजिनदार डॉ. अरविंद नांगरे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
 डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्यसेवेसोबतच क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.भाळवणी वॉरियर्सच्या विजयानंतर संघातील खेळाडूंचा जल्लोष पाहण्यासारखा होता.

🔶🔶🔶🔶
खेळाडूंची जिद्द, एकजूट आणि क्रीडाभावामुळे स्पर्धेला उत्तुंग यश मिळाले.PTMPA ने सर्व खेळाडू, डॉक्टर कुटुंबीय आणि उपस्थित प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले असून पुढील वर्षी PDPL आणखी भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा मानस व्यक्त करत आहे. 
 – डॉ. संदीप औटी, अध्यक्ष, पारनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *