पारनेर / भगवान गायकवाड, 

      आजच्या काळात सामाजिक सलोखा आणि परस्पर सामंजस्याची गरज लक्षात घेऊन, सावित्री फातेमा सदभावना मंच, पारनेर यांच्या वतीने “शेजारधर्म” या महत्त्वपूर्ण विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सर्व धर्म आणि जातीचे लोक एक दुसऱ्याचे शेजारी असून, प्रत्येक धर्म आणि महापुरुषांनी ‘शेजारधर्मा’चे महत्त्व अधोरेखित केले आहे. याच उदात्त हेतूने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

हा परिसंवाद दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत दर्गाह मस्चिद, पारनेर येथे संपन्न होणार असल्याची माहिती सावित्री फातेमा सदभावना मंचचे कार्याध्यक्ष डॉ. रफिक सय्यद यांनी दिली आहे.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये ह. भ. प. प्रा. अशोक शिंदे, ह. भ. प. प्रा. रभाजी औटी, गौरव उद्योग समूहाचे अर्जुन भालेकर, किसान युनियन परिवाराचे चंद्रकांत चेडे यांचा समावेश आहे. तसेच, नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे, नगरसेवक युवराज पठारे, सौ. शेख शगुप्ता, डॉ. आर जी सय्यद, सरस्वती जावळे, पारनेर पब्लिक स्कूलचे संस्थापक गिताराम म्हस्के, प्रा. शाहूराव औटी, राजेंद्र करंदीकर, आणि ह. भ. प. सोपानकाका औटी आदी मान्यवर व्यासपीठाची शोभा वाढवतील.

या परिसंवादातून उपस्थित मान्यवर ‘शेजारधर्म’ या संकल्पनेवर प्रकाश टाकून आजच्या काळात त्याची आवश्यकता आणि सामाजिक बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी काय भूमिका घ्यावी, यावर मार्गदर्शन करतील.

सावित्री फातेमा सदभावना मंचने परिसरातील सर्व नागरिकांना, विशेषतः विविध धर्म आणि समाजाच्या लोकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक सलोख्याच्या या प्रयत्नाला पाठिंबा द्यावा, असे विनम्र आवाहन केले आहे. हा परिसंवाद सामाजिक एकोपा वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *