जुन्नर:
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह घटना समोर आली आहे. न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. हा हल्ला बांधकाम कामगार नोंदणीतील भ्रष्टाचाराची बातमी समोर आणल्यामुळे झाल्याचे समजते.
सचिन तोडकर यांनी जुन्नर तालुक्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी विशेष बातमी न्यूज 18 लोकमत वर दाखवली होती. या बातमीत खाजगी एजंटांकडून कामगारांची आर्थिक लूट, मोफत मिळणाऱ्या वस्तूंसाठी पैसे वसूल करणे आणि शिष्यवृत्तीतील भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकार उघड झाले होते.
एजंट कामगारांकडून 1000 ते 1100 रुपये आकारतात.
मोफत भांडी वाटपासाठी 1100 ते 1500 रुपये घेतले जातात.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील अर्धे पैसे एजंट लुबाडतात.
या बातमीनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि प्रतिनिधीच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. वाहनाच्या काचेला नुकसान झाले असून, ही घटना पत्रकारांवरील खुले हल्ल्याचा गंभीर प्रकार मानली जात आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा तीव्र निषेध:
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी या घटनेचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की,
> “बातमी दाखवल्यामुळे पत्रकारांवर हल्ला होणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. आम्ही पत्रकार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
तसेच, दैनिक जनप्रवासचे संपादक सिद्धार्थ भोकरे यांना मिळालेल्या धमकीचाही निषेध करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने संबंधित हल्लेखोर आणि धमकी देणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलीस यंत्रणेवर प्रश्न:
या घटनेमुळे स्थानिक पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पत्रकारांवर होणारे हल्ले आणि धमक्यांना अटकाव घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत विविध पत्रकार संघटनांनी व्यक्त केले आहे.
हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून, सत्य उजेडात आणणाऱ्या संपूर्ण पत्रकारितेवर आहे. दोषींवर कठोर कारवाई करून पत्रकारांना संरक्षण देणे हे सरकार आणि यंत्रणांचे कर्तव्य आहे.
फोटो सौजन्य – News18 Lokmat




