सेवावस्तीतील विद्यार्थ्यांची वैज्ञानिक झेप; बालभवनचे १७ वे विज्ञान प्रदर्शन उत्साहात साजरे 

अहिल्यानगर ( भगवान गायकवाड),
स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पातर्फे नगर शहरातील झोपडपट्टी भागातील सुमारे ७०० वंचित व शैक्षणिकदृष्ट्या मागास बालकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवनिर्मिती क्षमता आणि ‘टाकाऊपासून टिकाऊ’ संकल्पनेची जाणीव रुजविण्यासाठी वर्ष सतरावे विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले.

*“सृष्टीचे चक्र, विज्ञानाच्या दृष्टीकोनातून” या थीमवर आधारित विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व पारितोषिक वितरण कार्यक्रम* अबट पेट्रोल पंपाशेजारी, रामवाडी, सर्जेपुरा, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला होता. इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते नववी अशा दोन गटांमध्ये विभागणी करून विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान, गणित, पर्यावरण, सामाजिक शास्त्र व खगोलशास्त्र विषयांवरील प्रयोग व मॉडेल्स सादर केले. एकूण ३२२ विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला.

 *पारितोषिक विजेते:* 
*मोठा गट (इ. ६ ते ९)*
• पास्कलचा नियम — उत्कर्ष बालभवन (प्रथम)
• पायझो इलेक्ट्रिक शूज — उर्जा बालभवन (द्वितीय)
• स्मार्ट सिटी — डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालभवन, छत्रपती संभाजीनगर (तृतीय)
*लहान गट (इ. १ ते ५)*
• मानवी ज्ञानेंद्रिय — उर्जा बालभवन (प्रथम)
• हळद प्रयोग — क्षितीज बालभवन (द्वितीय)
• अन्न, आरोग्य व स्वच्छता — परीस बालभवन (तृतीय)
प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ निवडलेल्या गटांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्यरूपी बक्षिसे प्रदान करण्यात आली.

*विविध विषयांचा आविष्कार:*
प्रदर्शनात वातावरणीय दाब, पास्कलचा नियम, रासायनिक अभिक्रिया, मानवी पचनसंस्था, जलचक्र, सौर ऊर्जा, जलशुद्धीकरण, फ्री एनर्जी जनरेटर, सुका-ओला कचरा व्यवस्थापन, प्रदूषण, सेंद्रिय खते, गणितीय रोबोट, ट्रॅफिक नियम, स्मार्ट सिटी, हवाई आपत्ती व्यवस्थापन तसेच अमावस्या-पौर्णिमा यांसारख्या विषयांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांतून विज्ञानाचा समाजहितासाठी उपयोग व्हावा, हा संदेश स्पष्टपणे उमटला.

*मान्यवरांचे मार्गदर्शन:* 
कार्यक्रमासाठी उपमहापौर मा. धनंजय जाधव, स्नायडर कंपनीचे जनरल मॅनेजर वासुदेव गायकवाड उभयंता , मा. अरुण तुपविहीरे, उद्योजक जनकसेठ आहुजा, मा. शारदा होशिंग, मा. सविता बेल्हेकर, मुख्याध्यापिका शीतल गुंदेचा, स्नेहालय संस्थेचे विश्वस्त राजीव गुजर, अनिवासी विभाग संचालक हनीफ शेख, बालभवनच्या मानद संचालिका वैशाली चोपडा डॉ. सोनाली गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.मा. वासुदेव गायकवाड यांनी सातत्य, आत्ममूल्यमापन व नियमित अभ्यास हे यशाचे सूत्र असल्याचे सांगितले.मा. सविता बेल्हेकर यांनी विज्ञान हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले.मा. शीतल गुंदेचा यांनी ‘का?’ विचारण्याची सवयच शोधाला दिशा देते, असे प्रतिपादन केले. मा. राजीव गुजर यांनी जिज्ञासाच प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. मा. शारदा होशिंग यांनी धाडस, आत्मविश्वास व प्रभावी सादरीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आदर्श साबळे, कु हर्षदा वाकचौरे यांनी केले. प्रस्तावना मानद संचालिका वैशाली चोपडा यांनी तर आभार प्रदर्शन प्रकल्प व्यवस्थापिका उषा खोल्लम यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतीक्षा साळवे, राजू पांढरे, रुबिना शेख, यास्मिन शेख, जयश्री रसाने, जयश्री शिंदे, व संपूर्ण बालभवन टीमने परिश्रम घेतले. विज्ञान, जिज्ञासा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *