हंगा येथे शाखा उद्घाटन व भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न
पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील मौजे हंगा येथे रविवार, दि.१८ जानेवारी २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या नूतन शाखेचा उद्घाटन समारंभ आणि भव्य कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी “वंचित बहुजन आघाडी हाच पिचलेल्या समाजाचा खरा आधार असून, आगामी काळात ही राजकीय ताकद वाढवणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्यासह पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे, प्रसाद भिवसणे, जे. डी. शिरसाट, ‘युनिटी ऑफ मुनिवासी बहुजन समाज’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक योगेश साठे यांनी आपल्या भाषणात ‘भारिप बहुजन महासंघ’ ते ‘वंचित बहुजन आघाडी’ या प्रवासावर सखोल प्रकाश टाकला. हा प्रवास सोपा नव्हता, असे सांगताना त्यांनी विविध राजकीय पक्षांनी निर्माण केलेले अडथळे आणि विरोधकांशी दिलेल्या लढ्याची माहिती दिली. साठे पुढे म्हणाले की, “अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केवळ सत्ताप्राप्तीसाठी नव्हे, तर संविधान वाचवण्यासाठी ईव्हीएम (EVM) मशीनला प्रखर विरोध दर्शवला आहे. आजची महागाई, बेरोजगारी आणि अन्न-वस्त्र-निवारा यांसारख्या मूलभूत समस्या प्रस्थापितांच्या चुकीच्या धोरणांमुळेच निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला एकदा संधी देऊन पहा,” असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.
तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, “बाबासाहेबांनी आपल्या चार मुलांचा बळी देऊन, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत कष्ट उपसून एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाला गुलामीतून मुक्त केले. परंतु दुर्दैवाने आजचा बहुजन समाज पुन्हा प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधला गेला आहे. या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवणे आवश्यक आहे.”यावेळी हंगा गावचे माजी सरपंच राजेंद्र शिंदे ,संतोष आडसूळ आणि संतोष वाबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीचे संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार बोलून दाखवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सूर्यवंशी यांनी केले आणि आभार प्रदर्शन राजेंद्र करंदीकर यांनी मानले.




