पारनेर /प्रतिनिधी : 
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या पुढाकाराने वासुंदे ठाकरवाडी येथे मोफत जातीचे दाखले वाटपाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. देवकृपा फाउंडेशनच्या सहकार्याने रविवार, दि. 22 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता हा कॅम्प होणार आहे. या उपक्रमाद्वारे आदिवासी कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.सुजित झावरे पाटील यांनी या उपक्रमाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, “आदिवासी समाज हा आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, अनेक कुटुंबांकडे जातीचे दाखले नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी काम करत आहे आणि हा उपक्रम त्याच दिशेने एक पाऊल आहे. आम्ही या कॅम्पच्या माध्यमातून सर्वसामान्य आदिवासी कुटुंबांना मोफत जातीचे दाखले उपलब्ध करून देऊ, जेणेकरून त्यांना शिक्षण, रोजगार आणि शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हेच माझे ध्येय आहे.”झावरे पाटील पुढे म्हणाले, “हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी देवकृपा फाउंडेशन आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य मोलाचे आहे. आदिवासी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपले हक्क मिळवावेत, असे आवाहन मी करतो.” या उपक्रमामुळे आदिवासी समाजाला सशक्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *