पारनेर : ता. प्रतिनिधी, 

 तालुक्यातील भनगडेवाडी येथील श्रीम. सुनीता अंबादास अडसूळ या बांधकाम कामगार असून त्यांचे पती कै. अंबादास देवराम अडसूळ हे देखील बांधकाम क्षेत्रात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे मंजुरी करत असताना दुःखत निधन झाल्यानंतर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या सुनीता अडसूळ यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेंतर्गत अंत्यविधी सहाय्य व मृत्यू पश्चात मिळणाऱ्या आर्थिक अनुदानासाठी संबंधित विभागाकडे अर्ज दाखल केला.

मात्र, संबंधित लाभ मंजूर करून देण्यासाठी मध्यस्थीमार्फत तब्बल ₹५५ हजारांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री शिंदे यांना समजली. त्यांनी कोणताही विलंब न लावता ही बाब पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार काशिनाथ दाते सर यांच्या निदर्शनास आणून दिली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार दाते सरांनी तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चौकशी केली. कोणत्याही गरजू लाभार्थ्यावर अन्याय होऊ नये आणि शासनाच्या योजनांचा लाभ कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मागणीशिवाय पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यांच्या स्पष्ट निर्देशांनंतर प्रकरणाचा तातडीने पाठपुरावा करण्यात आला.

या पाठपुराव्याला यश येत अंत्यविधीसाठी ₹१०,००० तसेच बांधकाम कामगाराच्या मृत्यूनंतर मिळणारे ₹२,००,००० असे एकूण ₹२,१०,००० चे अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मंजूर करण्यात आले असून ही संपूर्ण रक्कम सुनीता अडसूळ यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली आहे.

श्रीम. सुनीता अडसूळ यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे हक्काचे घरही उपलब्ध नाही. अशा बिकट परिस्थितीत मिळालेला हा निधी त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरला आहे.

या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी सौ. जयश्री शिंदे यांची जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता आणि आमदार काशिनाथ दाते यांची तात्काळ निर्णयक्षमता व जनहितासाठीची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. शासनाच्या योजनांचा लाभ हा केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घेतलेली भूमिका समाजासाठी आश्वासक असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

◼️ “माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्यावर मोठे दुःख आणि आर्थिक संकट कोसळले होते. शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठीही अडथळे निर्माण होत असल्याने मी पूर्णपणे हतबल झाले होते. मात्र आमदार काशिनाथ दाते सर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी सौ. जयश्री शिंदे यांनी तत्परतेने पाठपुरावा करून मला माझ्या हक्काचे ₹२ लाख १० हजारांचे अनुदान मिळवून दिले. त्यांच्या या मोलाच्या सहकार्यामुळे माझ्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून मी त्यांची मनःपूर्वक ऋणी आहे.”

– श्रीम. सुनीता अडसूळ (लाभार्थी)

◼️ “शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही गरीब, गरजू नागरिकाला पैशांची मागणी होऊ नये, हीच आमची भूमिका आहे. श्रीम सुनीता अडसूळ यांच्यावर अन्याय होत असल्याचे समजताच ही बाब तातडीने आमदार काशिनाथ दाते सरांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांच्या ठाम पाठपुराव्यामुळे संबंधित महिलेला तिच्या हक्काचे संपूर्ण अनुदान मिळाले. सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हीच कार्यकर्त्यांची खरी जबाबदारी आहे.”


– सौ. जयश्री शिंदे (उपाध्यक्षा, पारनेर राष्ट्रवादी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *