खासदार नीलेश लंके मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर : प्रतिनिधी, 

महाराष्ट्रातील मेंढपाळ, धनगर समाज आणि पारंपरिक पशुपालकांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, पशुधन चारण्यासाठी जाणाऱ्या गुराख्यांवर वन विभागाकडून करण्यात येणारी दंडात्मक कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले आहे. 

             महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालनाला महत्त्वाचे स्थान असून, लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह मेंढ्या, शेळ्या व इतर पशुधनावर अवलंबून आहे. धनगर व पारंपरिक पशुपालक समाजातील कुटुंबे पिढ्यान्पिढ्या वनक्षेत्रालगतच्या सरकारी पडीक व गायरान जमिनीवर पशुधन चारून उपजीविका करीत आहेत. मात्र, अलीकडील काळात राज्यातील विविध भागांत वन विभागाच्या स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पारंपरिक गुराख्यांवर अन्यायकारक कारवाई होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे लंके यांनी पत्रात नमूद केले आहे.

        पशु चराईच्या कारणावरून गुराख्यांना अडविणे, त्यांच्याशी गैरवर्तन करणे, महिलांशी अभद्र वर्तन करणे, पशुधन जबरदस्तीने ताब्यात घेणे, मोठा दंड आकारणे तसेच कथित खोटे किंवा किरकोळ गुन्हे दाखल करणे, अशा तक्रारी पशुपालकांच्या प्रतिनिधींनी आपल्याकडे मांडल्या आहेत. एकीकडे चारा टंचाई, दुष्काळी परिस्थिती आणि पशुपालनाचा वाढता खर्च यामुळे हा समाज आर्थिक संकटात आहे. त्यातच अशा कारवाईमुळे हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.

             वन, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट करताना, वनसंवर्धनाच्या नावाखाली गरीब पशुपालकांच्या पारंपरिक उपजीविकेवर गदा येणे योग्य नाही, अशी भूमिका लंके यांनी मांडली. गुराखी हा गुन्हेगार नसून प्रतिकूल परिस्थितीत पशुधन सांभाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा मेहनतकरी नागरिक आहे,असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

          सरकारी पडीक व गायरान जमिनीवर पशुधन चारणाऱ्या गरीब गुराख्यांविरुद्ध करण्यात येणारी कठोर कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पशु चराईच्या कारणावरून दाखल झालेल्या किरकोळ अथवा कथित खोट्या प्रकरणांची निष्पक्षपणे फेरतपासणी करून योग्य ती प्रकरणे मागे घ्यावीत. तसेच पशुपालकांशी गैरवर्तन करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर विभागीय कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

            प्रत्येक जिल्ह्यात स्पष्ट ‘चराई क्षेत्र’ निश्चित करून पशुपालक आणि वन विभाग यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी संतुलित व न्याय्य धोरण जाहीर करावे, अशी प्रमुख मागणी खासदार लंके यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. वन्यजीव व वनसंपदेचे संरक्षण कायम ठेवतानाच पारंपरिक पशुपालकांच्या उपजीविकेला सुरक्षितता मिळेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

          वनसंवर्धन आणि पशुपालकांच्या उपजीविकेचा समतोल साधणारे धोरण केंद्र व राज्य सरकारने आखावे. पशुपालकांना सुरक्षित चराई क्षेत्र उपलब्ध करून दिल्यास वनक्षेत्राचे संरक्षण आणि पशुपालकांचा उपजीविकेचा प्रश्न या दोन्ही बाबींचा समन्वय साधता येईल, असा विश्वासही लंके यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *