माळकुप बचत गटाच्या महिलांचा गोरेश्वर पतसंस्थेवर गंभीर आरोप

निबंधक कार्यालयाकडे पतसंस्थेची तक्रार, कडक कारवाईची केली निवेदनाद्वारे मागणी

पारनेर / प्रतिनिधी, 

पारनेर तालुक्यातील माळकुप येथील योगिता पोपट खांडके यांच्या बचत गटाने गोरेश्वर पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. थकबाकीमुळे गोरेश्वर पतसंस्थेने थकीत कर्जदार व जामीनदार यांच्यावर १०१ कारवाई सुरू केली.

 जामीनदारांच्या जमिनींवर बोजा चढवला गेला, म्हणजे जमीन जप्तीची प्रक्रिया सुरू झाली. पण तरीही पतसंस्थेने जामीनदारांच्या बँक खात्यांमध्ये अनधिकृतपणे गोठवणी केली. जमीन जप्त असताना लिलाव का नाही केला? आणि खाते गोठवण्याचा अधिकार पतसंस्थेला असतो का? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला.

या कारवाईमुळे कर्जदार आणि जामीनदार आक्रमक झाले. त्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालय, पारनेर येथे धाव घेतली. सहाय्यक निबंधक श्री विकास जाधव साहेब रजेवर असल्याने सहकार अधिकारी श्रेणी-१ राजेंद्र वाघमोडे यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या कार्यालयाकडून खाते गोठवण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. ही कारवाई पतसंस्थेने स्वतः केली असावी. यावर महिलांनी पतसंस्था आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात अर्ज दाखल केला की, दोषींवर कडक कारवाई व्हावी. अन्यथा सोमवारी सर्व महिला आत्मदहन करतील आणि जबाबदारी निबंधक कार्यालयाची राहील, असे नमूद केले.

कायदेशीर दृष्ट्या, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात जमीन जप्तीला कलम १०१ अंतर्गत प्रक्रिया आहे. लिलावाआधी खाते गोठवणे हे स्वतंत्र परवानगीशिवाय बेकायदेशीर ठरू शकते. दोषी असलेल्या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हायला हवी. सहाय्यक निबंधक कार्यालयाने स्वतः तपास करून, खाते गोठवण्याचे आदेश कोणी दिले, कागदपत्रे काय सांगतात हे पाहिले पाहिजे. जर अनधिकृत असेल तर सबंधित कर्मचाऱ्यावर सहाय्यक निबंध कार्यालय मार्फत कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या बचत गटाच्या महिलांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *