पारनेर / भगवान गायकवाड, 

समाजातील सकारात्मक कार्याला बळ देण्यासाठी आणि निस्वार्थ सेवा करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी पारनेरमध्ये एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. खा. निलेश लंके प्रतिष्ठान आणि ‘आपला मावळा’ सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने, पारनेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयास मानाचा ‘सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

खासदार निलेश लंके यांच्या हस्ते हा पुरस्कार संस्थेच्या संचालिका साधना दिदी तसेच प्रतिमा दिदी, राम भाई , मगर माताजी, रामदास गाढवे, सुषमा माता , श्रीमती औटी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पारनेर शहरातील कोर्ट गल्ली येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी विविध लोककल्याणकारी उपक्रम राबवले जातात. प्रामुख्याने खालील कार्यांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता आणि ताणतणाव मुक्तीसाठी संस्थेतर्फे विनामूल्य राजयोग प्रशिक्षण दिले जाते.
 तरुणाईला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी संस्थेने सातत्याने प्रभावी उपक्रम आणि समुपदेशन राबवले आहे. समाजात नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी विशेष कार्यशाळा घेतल्या जातात.

पुरस्कार प्रदान करताना खासदार निलेश लंके यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, “केवळ भौतिक विकास महत्त्वाचा नसून मानवाचा आध्यात्मिक आणि मानसिक विकास होणे काळाची गरज आहे. ब्रह्माकुमारी संस्था राजयोग आणि व्यसनमुक्तीच्या माध्यमातून समाजाला एक नवी दिशा देण्याचे पवित्र कार्य करत आहे.”

या पुरस्कारामुळे ब्रह्माकुमारी केंद्राचे सर्वत्र अभिनंदन होत असून, भविष्यातही अशाच प्रकारे समाजसेवेचे व्रत सुरू ठेवण्याचा निर्धार संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पारनेर तालुका आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *