पारनेर / प्रतिनिधी, 
तालुक्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून अनेक भागांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पारनेर शहराजवळ असलेल्या सोबलेवाडी येथील वाडी-वस्तीवर हीच दुष्काळाची दाहकता ओळखून सामाजिक कार्यकर्त्या सुनिताताई सोबले यांनी स्वखर्चातून मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि लोकउपयोगी कार्यामुळे सोबलेवाडी परिसरातील नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पारनेर परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत होती, तर पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन सुनीताताई सोबले यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तात्काळ पाऊल उचलले.
सुनिताताई या नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून परिसरात सक्रिय असतात. 


सध्याची पाण्याची निकड ओळखून त्यांनी सोबलेवाडी परिसरातील प्रत्येक घरोघरी थेट पिण्याच्या पाण्याचा टँकर पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे, तसेच हंडाभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला आहे.
पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या तात्पुरती सोडवण्यासाठी सुनिताताई यांनी केलेला हा आटोकाट प्रयत्न खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरत आहे.

 प्रशासकीय टँकरची वाट न पाहता, लोकसेवेचे व्रत घेत त्यांनी सुरू केलेल्या या कामाचे सोबलेवाडी आणि पारनेर परिसरातील नागरिकांमधून जोरदार कौतुक होत असून, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *