पारनेर / ता. प्रतिनिधी  
पळशी ता. पारनेर येथे आज विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम आमदार काशिनाथ दाते सरांचे चिरंजीव डॉ. प्रदीप दाते यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी मलवीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून सायकल वितरण करण्यात आले तसेच विद्यालयाकडे जाणाऱ्या सुमारे १० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या रस्ता काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला नवी गती मिळणार असून शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यामुळे विशेषतः पावसाळ्यातील वाहतुकीची समस्या दूर होऊन विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी बोलताना डॉ. प्रदीप दाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे, मोठी स्वप्ने पाहावीत आणि प्रामाणिक परिश्रमातून आपल्या कुटुंबाचे व समाजाचे नाव उज्ज्वल करावे, मलवीर विद्यालयात आज ४० विद्यार्थ्यांना सायकल वाटप होत असल्याने अत्यंत आनंद होत आहे. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी अंतराची अडचण भेडसावत असते. शासनाच्या या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत येणे-जाणे सोपे होईल आणि शिक्षणासाठी अधिक वेळ देता येईल. ही सायकल केवळ प्रवासाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करणारा एक विश्वासाचा साथीदार आहे. 

ते पुढे म्हणाले की, विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुमारे १० लाख रुपयांच्या निधीतून काँक्रीटीकरण करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. शिक्षणाची वाट अधिक सुकर व्हावी हा या विकासकामामागील मुख्य उद्देश आहे. पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर नेहमीच शिक्षण, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील विकासाला प्राधान्य देत आले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.


यावेळी मुख्याध्यापक आर. टी. शिंदे सर, गणेश शिंदे, सुभाष गांधी, राहुल सुडके, कैलास चिकणे, नंदू शिंदे, आकाश कोकाटे, किसन काळे, कृष्णा सुडके, विकास रोकडे, सम्राट साळवे, संपत जाधव, आनंद गांधी, पोपट मोढवे, शिवा पारधी, रावसाहेब साळवे, नितीन पाटोळे, गीताराम साळवे, सिताराम साळवे यांसह मलवीर विद्यालयाचे सर्व शिक्षक, पालक व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶
 ग्रामस्थांच्या मागणीनुसार यापूर्वीही विविध विकासकामे मार्गी लावून गावाच्या विकासाला गती दिल्याबद्दल आणि आता पुन्हा पळशी–वनकुटे रस्त्यावरील पुलासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून गावाच्या महत्त्वाच्या प्रश्नाला न्याय दिला आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मी आमदार काशिनाथ दाते सरांचे मनःपूर्वक आभार मानतो.
– गणेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते 

🔶🔶🔶🔶🔶
 मलवीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून सायकल उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला मोठी मदत होणार आहे. तसेच शाळेकडे येणाऱ्या सुमारे १० लाख रुपयांच्या काँक्रीट रस्त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांची ये-जा अधिक सुलभ झाली आहे. या विकासकामांसाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार काशिनाथ दाते सरांचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक आभार.

– रामदास शिंदे, मुख्याध्यापक मलवीर विद्यालय पळशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *