पारनेर भगवान गायकवाड,
बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारा कवडीमोल दर आणि त्यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी यांच्या प्रश्नावर आता राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने त्वरित हस्तक्षेप करून कांद्याला रास्त हमीभाव द्यावा आणि ‘नाफेड’मार्फत खरेदी सुरू करावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पारनेर तहसील कार्यालयासमोर गुरुवारी भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दीपक कारखिले यांना सादर केले.
आंदोलनाचे नेतृत्व करताना भाकपचे तालुका सचिव कॉ. संतोष खोडदे यांनी सरकार आणि बाजार समितीतील दलालांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “आज खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, युरियाचा सर्रास काळाबाजार होत आहे आणि शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नाही. मजुरीचे दर वाढल्याने उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे. अशा परिस्थितीत रात्रीचा दिवस करून पिकवलेला लाल कांदा साठवणूक करता येत नसल्याने शेतकरी तो केवळ १००० ते ११०० रुपये क्विंटलने विकण्यास हतबल झाला आहे.”
बाजार समित्यांमध्ये दलाल आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून नाफेडद्वारे कांदा खरेदी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी खोडदे यांनी केली.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या….
कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त हमीभाव जाहीर करून नाफेडमार्फत खरेदी सुरू करावी. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कमी भावात कांदा विकला आहे, त्यांना शासनाने विशेष अनुदान द्यावे. कांदा निर्यातीला प्रोत्साहन देऊन जागतिक बाजारपेठ खुली करावी.बाजार समितीत आणलेल्या कांद्याचा वाहतूक खर्च, बारदाना, कडता आणि विविध करांमधून शेतकऱ्यांना सवलत मिळावी.
किसान सभेचे नेते कॉ. कैलास शेळके यांनी भारत सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “शून्य आयात करामुळे अमेरिकेतील गहू, सोयाबीन, मका आणि दुग्धजन्य पदार्थ भारतीय बाजारपेठेत आल्यास स्थानिक शेतकरी देशोधडीला लागेल.” महेंद्र पांढरकर यांनीही शासनाने शेतकरी हिताचे ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या आंदोलनात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष बबन सालके, संजय भगत, राजेंद्र गायकवाड, सुरेश होले, हरिभाऊ गायकवाड, दीपक इंगळे, सुशांत शिंदे, अंकुश गायकवाड, अमोल ठुबे, सुलाबाई आदमाने यांच्यासह पारनेर तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.




