वीजबिलात बचत, पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल
पारनेर : प्रतिनिधी,
सर्वसामान्य नागरिकांना केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ चा लाभ सुलभपणे मिळावा, सौरऊर्जेचा वापर ग्रामीण भागात अधिकाधिक वाढावा आणि वीजबिलाच्या वाढत्या खर्चातून नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून पारनेर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ संपर्क केंद्राचा भव्य शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे नागरिकांना योजनेची संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच सौरऊर्जा प्रणाली उभारणीबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
देशात स्वच्छ आणि हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ अंतर्गत घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी अनुदान दिले जात आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, नागरिकांना शासकीय प्रक्रियेतील अडचणी दूर व्हाव्यात आणि सौरऊर्जेचा वापर वाढावा, यासाठी खासदार नीलेश लंके यांनी आपल्या संपर्क कार्यालयात स्वतंत्र मार्गदर्शन व सहाय्य केंद्र सुरू करण्याचा पुढाकार घेतला आहे.
या संपर्क केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना योजनेची पात्रता, ऑनलाइन नोंदणी, आवश्यक कागदपत्रे, अनुदानाची प्रक्रिया, सौर पॅनेल बसविण्याबाबत तांत्रिक माहिती तसेच शासनाच्या विविध नियमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची गरज भासणार नसून, एका ठिकाणी सर्व प्रकारचे मार्गदर्शन मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेतल्यास नागरिकांच्या मासिक वीजबिलात मोठ्या प्रमाणात बचत होणार असून दीर्घकालीन दृष्टीने ऊर्जा खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होऊन स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढण्यास हातभार लागणार आहे. हवामान बदल आणि वाढते प्रदूषण यांसारख्या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा प्रसार हा काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
शुभारंभ सोहळ्यास दीपक लंके, बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर, माजी संचालक मारुती रेपाळे, रा. या. औटी, सुदाम पवार, प्रा. संजय लाकुडझोडे, सचिन पठारे, कांतीलाल भोसले, संदीप भागवत, भिकाजी जगदाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामीण भागात सौरऊर्जेच्या वापराला गती देण्यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शन केंद्रांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित नागरिकांना पीएम सूर्य घर मोफत वीज योजना चा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर सौरऊर्जा प्रणाली बसवून वीजबिलात बचत करावी, पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे आणि ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन करण्यात आले.
खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे पारनेर तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ अधिक सुलभतेने मिळण्यास मदत होणार असून, स्वच्छ ऊर्जा समृद्ध भविष्य, प्रत्येक घर सौरऊर्जेकडे हा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




