पारनेर / भगवान गायकवाड, 
जातेगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पाच टक्के दिव्यांग निधीतून १८ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे धनादेश (चेक) वाटप करण्यात आले. या उपक्रमातून दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला.

यावेळी गावातील दिव्यांग नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले.

घरकुल लाभार्थ्यांसाठी सौर उर्जेबाबत विशेष बैठक
याच कार्यक्रमानंतर घरकुल लाभार्थ्यांसाठी सौर ऊर्जा (सोलर) बसवण्याबाबत विशेष बैठक घेण्यात आली. घरांवर सोलर पॅनल बसवून वीज बचत आणि स्वयंपूर्ण ऊर्जा वापर कसा साधता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अनेक घरकुल लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री सौर योजनेत सहभागी होण्याबाबत उत्सुकता दर्शवली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

विकासकामांची उल्लेखनीय पूर्तता….
गावात समृद्ध ग्राम अभियानांतर्गत विविध विकासकामांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक महत्त्वाची उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत.
पाच टक्के निधीचे वाटप पूर्ण करण्यात आले असून कर व इतर वसुलीचे उद्दिष्ट गाठत ५० टक्के वसुली पूर्ण करण्यात आली आहे. घरकुल योजनेंतर्गत सुरू असलेली सर्व घरे पूर्ण करून घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्यात आले आहे. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे पूर्ण करून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.

या प्रसंगी मा. सरपंच संजय गायकवाड, विठ्ठल पोटघन, कांताबाई हरगुडे, विलास ढोरमले, ग्रामसेवक राजू विधाटे, कर्मचारी अनिल ढोरमले, विठ्ठल ढोरमले, बाळू ढोरमले आदी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांची पाहणी भेट….
काही दिवसांपूर्वी आनंद भंडारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी गावाला भेट देऊन अभियानांतर्गत झालेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. त्यांनी समाधान व्यक्त करत नागरिकांशी संवाद साधला.

🔶🔶🔶🔶🔶🔶
ग्राम समृद्ध अभियानांतर्गत शिवरस्ते खुले करण्यात आले.
तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांना सोलर देण्याबाबत घरकुल लाभार्थ्यांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती ग्रामसेवक राजू विधाटे यांनी दिली.
ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे विकासकामांना गती मिळाली असून अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कामाचे समाधान व्यक्त केले आहे.
– राजु विधाटे, ग्रामसेवक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *