पारनेर / भगवान गायकवाड,
‘आवाज लोकशाहीचा’ या वृत्तवाहिनीचे संपादक विजय चव्हाण यांनी ‘संत आणि महापुरुषांचे सामाजिक योगदान आणि आजची सामाजिक परिस्थिती’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संत साहित्याचे गाढे अभ्यासक, विचारवंत व सावित्री फातिमा सदभावना मंचचे कार्याध्यक्ष डॉ. रफिक सय्यद यांची विशेष मुलाखत घेतली. डॉ. सय्यद यांनी संत परंपरेने समाजाला दिलेल्या अमूल्य देणगीवर प्रकाश टाकून आजच्या सामाजिक आव्हानांवर परखड भाष्य केले.मुलाखतीच्या सुरुवातीला डॉ. सय्यद यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेचा गौरवशाली इतिहास मांडला. संत कबीर,संत तुकाराम, संत नामदेव , संत शेख महमंद महाराज,आणि आधुनिक काळातील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता,फातिमा शेख,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,या महापुरुषांनी आपल्या विचारांनी आणि कृतीने समाजाला दिशा दिली. त्यांनी स्पष्ट केले की, संतांचे साहित्य हे केवळ धार्मिक नसून ते जातिभेद, लिंगभेद आणि विषमतेविरुद्ध उभे राहिलेले एक प्रखर मानवतावादी आंदोलन होते. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ म्हणणाऱ्या संतांनी समता, बंधुता आणि न्यायाची स्थापना केली, ज्यामुळे एका नव्या, सुधारित समाजाचा पाया रचला गेला.
‘त्या’ आणि ‘आजच्या’ समाजकारणातील अंतर
संपादक विजय चव्हाण यांनी आजच्या सामाजिक परिस्थितीवर प्रश्न विचारल्यावर डॉ. सय्यद म्हणाले की, संतांनी ‘माणुसकी’ हा धर्म शिकवला. पण, आजच्या समाजात स्वार्थ, भोगवाद आणि असहिष्णुता वाढताना दिसत आहे. संत साहित्यातून मिळणारा ‘समानतेचा संदेश’ आज राजकीय आणि सामाजिक स्वार्थापोटी दुर्लक्षित होत आहे. महापुरुषांचे आदर्श केवळ जयंती-पुण्यतिथ्यांपुरते मर्यादित न ठेवता, त्यांचे विचार आचरणात आणणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे.संतांनी दिलेली शिकवण ही एका नव्या जीवनशैलीचा आधार होती. आज आपण त्यांच्या विचारांवर फक्त चर्चा करतो, पण त्यानुसार जगत नाही. हीच आजच्या सामाजिक विसंगतीची मूळ समस्या आहे,” असे मत डॉ. सय्यद यांनी ठामपणे मांडले.डॉ. रफिक सय्यद यांनी मुलाखतीच्या समारोपात आजच्या युवा पिढीला मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, संतांचे विचार केवळ अभ्यासासाठी नसून ते सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित जीवनासाठी प्रेरणास्रोत आहेत. महापुरुषांनी समाजाला दिलेले सामाजिक, शैक्षणिक आणि नैतिक योगदान समजून घेतल्यास, आजच्या अनेक समस्यांवर मात करता येऊ शकते. सामाजिक समरसता टिकवून ठेवण्यासाठी संतांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे अत्यंत आवश्यक आहे.एकंदरीत, ही मुलाखत संत आणि महापुरुषांच्या योगदानाच्या पुनर्विचारासाठी आणि आजच्या समाजाला आत्मपरीक्षण करण्यासाठी उद्युक्त करणारी ठरली.




