पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (PTMPA) च्या वतीने रविवारी पंढरपूर वारीदरम्यान इंदापूर येथे भक्ती आणि सेवेचा अनोखा संगम साकारला. ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ या उक्तीप्रमाणे 70 डॉक्टरांनी एकत्र येत 50 दिंडीतील 1200 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार केला. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 500 किलोमीटर प्रवास करीत त्यांनी ही सेवा अखंडपणे दिली.
या उपक्रमात मोफत आरोग्य तपासणी, औषधवाटप, प्राथमिक उपचार, आपत्कालीन सेवा आणि जनजागृती अशा विविध सेवा वारकऱ्यांना देण्यात आल्या. पंढरपूर वारीच्या मार्गावर चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांना याचा थेट लाभ झाला. PTMPA चे अध्यक्ष डॉ. संदीप औटी म्हणाले, “वारी ही श्रद्धा आणि सेवाभावाचा संगम आहे. डॉक्टर म्हणून समाजाप्रती आमची जबाबदारी आहे. वारकऱ्यांसाठी काही देण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
इंदापूरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टर्स वारीत सहभागी झाले. वारकऱ्यांनी या उपक्रमाचे विशेष स्वागत आणि कौतुक केले. “सेवा हीच खरी भक्ती” हे या उपक्रमाने पुन्हा सिद्ध केले. पुढील वर्षी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा मानस PTMPA ने व्यक्त केला आहे.
या यशस्वी उपक्रमासाठी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र वाकळे, सचिव डॉ. पांडुरंग थोरात, सहसचिव डॉ. सुशील पादीर, खजिनदार डॉ. अरविंद नांगरे आणि वर्किंग कमिटीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“‘कर्मरूप सेवा तुझ्या पदी वाहतो मी’” या भावनेने हा उपक्रम आरोग्य आणि भक्तीचा सुंदर संगम ठरला.





