पारनेर / भगवान गायकवाड,
तालुक्यातील निघोज येथे युनिटी ऑफ मूलनिवासी समाज यांच्या वतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती फातिमा शेख, सत्यशोधक मुक्ता साळवे आणि त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा तालुकास्तरीय संयुक्त जयंती महोत्सव शनिवार, दि. ७ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५:३० वाजता सोनवणे मळा येथे हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती राजेंद्र करंदीकर यांनी दिली.
या महोत्सवासाठी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रफिक सय्यद, कु. रोशनी गायकवाड आणि कु. मृण्मयी करंदीकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाला सुधामती कवाद, खंडू भुकन, दिलीप सोनवणे, डॉ. प्रमोद हिरभगत, महेंद्र रोकडे, ॲड. सविता नगरे यांसह अनेक मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लहान मुलांची भाषणे. यामध्ये कु. आर्या तांबे, कु. संबोधी सोनवणे, कु. एंजल बनसोडे यांसह इतर बालके आपले मनोगत व्यक्त करतील. याच सोहळ्यात कुस्ती, ज्युडो आणि कुराश अशा क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर यश मिळवणाऱ्या पै. तन्वी दत्तात्रय सरोदे (वडगाव सावताळ) हिचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
या महोत्सवासाठी पारनेर तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




