अ.नगर डिस्ट्रिक्ट से. टीचर्स को-ऑप. क्रे. सो.च्या वतीने सेवानिवृत्त कृतज्ञता सोहळा
पारनेर / ता. प्रतिनिधी,
अ.नगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटी, शाखा पारनेर यांच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शहीद जवान मदत निधी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी जी.एस. महानगर को-ऑपरेटर्स बँकेच्या अध्यक्षा गितांजलीताई शेळके, अ.जि.म. वि. प्र.स. डॉ. भाऊसाहेब खिलारी, चेअरमन आप्पासाहेब शिंदे, एस.डी. आंधळे, व्हा. चेअरमन अर्जुनराव वाकळे, संचालक महेंद्र हिंगे,वर्षा खिलारी, वैशाली दारकुंडे, विजय पठारे, उमेश गुंजाळ, सुधीर कानवडे, किशोर धुमाळ, आप्पासाहेब जगताप, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे इ. मान्यवर व संस्थेचे सभासद, पाल्य व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
यावेळी बोलताना आमदार दाते सरांनी माध्यमिक शिक्षकांच्या कार्याचे मनापासून कौतुक करताना सांगितले की, “माध्यमिक शिक्षक हे समाजाचा कणा असून ते केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, टीकात्मक विचार आणि सामाजिक जबाबदारी रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. किशोरवयीन अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य-अयोग्य याची जाणीव करून देत त्यांना सुसंस्कृत व जबाबदार नागरिक बनवण्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे.”
ते पुढे म्हणाले की, शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, शिस्त, सहकार्य आणि समानतेची भावना निर्माण करतात. विविध पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून सामाजिक एकतेचा संदेश देण्याचे काम शिक्षक करत असतात. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि भविष्यातील योग्य निर्णय घेण्याची ताकद देण्याचे कामही शिक्षक करत असतात. त्यामुळे शिक्षक हे राष्ट्रनिर्माते असून त्यांच्या हातूनच देशाचा सक्षम नागरिक घडतो.
शासनाच्या सोयीसुविधांबाबत व्यक्त झालेल्या नाराजीवर आमदार दाते सर म्हणाले की, “शासन विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे. शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य, शेतकरी कल्याण यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. अलीकडेच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून त्याला मदत करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा आपत्तींचाही आर्थिक भार सांभाळत शासनाला विविध क्षेत्रांचा समतोल राखावा लागतो.”
तसेच त्यांनी नमूद केले की, “मतदारसंघातील प्रत्येक लहान-मोठ्या प्रश्नांकडे मी बारकाईने लक्ष देत असून विधानभवनातील माझी उपस्थितीही शंभर टक्के आहे. शिक्षकांच्या अडचणींबाबत मला पूर्ण जाणीव आहे आणि योग्य वेळी त्यावर निश्चितपणे उपाययोजना करण्यात येईल.”
कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध मान्यवरांच्या वतीने समाजातील शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शहीद जवान मदत निधी उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली. या सोहळ्यामुळे शिक्षक, विद्यार्थी व समाज यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ होत असून “शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार” हा संदेश अधोरेखित झाला.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
” प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत असला, तरी माध्यमिक शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय व शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी सामूहिक पातळीवर ठोस प्रयत्न होणे गरजेचे आहे. आमदार काशिनाथ दाते सर यांच्या उपस्थितीत या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जाईल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांवरील अनावश्यक दडपण कमी झाले असून कामकाज अधिक पारदर्शक झाले आहे. यापुढील काळातही हीच सकारात्मक व समाजाभिमुख दिशा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.”
– डॉ. भाऊसाहेब खिलारी




