टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी,
श्री ढोकेश्वर कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष मा. श्री. यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
युवकांच्या करिअरला दिशा देण्यासाठी तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ, महाविद्यालय व वेगवेगळ्या माध्यमातून जे जे उपक्रम राबवणे आवश्यक आहे ते सर्व उपक्रम राबवण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, पोलीस भरती, आर्थिक करिअर उद्योजकता, आयएएस आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी राज्यपातळीवरील स्पर्धा परीक्षा तयारी, बँकिंग सेवा, स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC), केंद्रीय पातळी स्पर्धा परीक्षा, एवढेच नव्हे दररोज तीन तास ऑनलाईन व ऑफलाईन आणि वर्षाचे ३६५ दिवस व एकूण एक हजार दिवस सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या एकंदरीत विकासाला चालणा देण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास घडवून आणणे हा या करिअर कट्ट्याचा उद्देश आहे.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापराने प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. विद्यार्थ्यांनी ते बदल आत्मसात करून वाटचाल केली पाहिजे. आताचे युग हे ए आयचे युग आहे असे मत श्री. शितोळे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थांनी सभोवताली होणाऱ्या बदलांकडे सकारात्मक दृष्टिकोनातुन पहावे व स्वतःचे करिअर करण्यासाठी सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) तयार करून वाटचाल करावी. विद्यार्थांनी सर्वांगीण विकास होण्यासाठी करिअर कट्टा उपक्रमामध्ये उस्फूर्तपणे सक्रिय सहभाग नोंदवून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लक्ष्मणराव मतकर हे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व उद्योजकता विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर कट्टाचा लाभ मिळावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून करिअर कट्टा उपक्रमाचे अहिल्यानगर जिल्हा प्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी व त्याच महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. विलास सुद्रिक हे उपस्थित होते. याप्रसंगी करियर कट्टा महाराष्ट्र शासन व महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमास बहुसंखेने विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे करियर कट्टा समन्वयक व उपप्राचार्य प्रा.विरेंद्र धनशेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संकेत ठाणगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. जिजाभाऊ घुले यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.





