पारनेर | ता. प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पारनेर तालुक्यात महत्त्वपूर्ण दौरा आयोजित करण्यात आला असून, या दौऱ्यामुळे तालुक्यातील विकासकामांना नवी गती मिळणार असल्याचा विश्वास पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केला आहे. तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या दौऱ्यादरम्यान दुपारी २.०० वाजता श्री गणेश मंगल कार्यालय, पारनेर येथे एस.आय.आर. संदर्भातील शासकीय आढावा बैठक, ३.०० वाजता पारनेर येथे त्याच ठिकाणी टंचाईबाबत आढावा बैठक, तसेच सायंकाळी ४.०० वाजता गांजी भोयरे ते पांढरे वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १४२.३९ लक्ष कामाचे भूमिपूजन आणि सायंकाळी ५.०० वाजता कुकडी डावा कालव्याच्या उर्वरीत दुरुस्ती करणे १६७.६६ कोटी कामांचे भूमिपूजन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
याबाबत आमदार काशिनाथ दाते म्हणाले, “पारनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यातून अनेक महत्त्वाच्या विकासकामांना चालना मिळणार असून, भविष्यातही तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक निधी व योजना उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. हा दौरा पारनेरच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.”
यावेळी आमदार दाते यांनी महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासकामांचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन केले.




