पारनेर / भगवान गायकवाड,
तालुक्यातील गोरगरीब जनतेला माफक दरात आणि वेळेत उपचार मिळावेत, या उदात्त हेतूने पारनेर शहरात ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, सध्या हे रुग्णालय रुग्णांना सेवा देण्याऐवजी आपल्या ढिसाळ नियोजनामुळेच अधिक चर्चेत येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील हायमास्ट दिवे आणि हॅलोजन बंद अवस्थेत असल्याने या परिसरात ‘अंधाराचे साम्राज्य’ पसरले असून, रुग्णालयाचा कारभारच अंधारात चालला आहे की काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.ग्रामीण रुग्णालयात केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात आपत्कालीन रुग्ण येत असतात. मात्र, प्रवेशद्वारावरच दिवा नसल्याने रुग्णवाहिका चालकांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
रात्रीच्या वेळी उपचारासाठी येणाऱ्या महिला, वृद्ध आणि बालकांना अंधारात चाचपडत रुग्णालयात प्रवेश करावा लागतो. या अंधारामुळे परिसरात अपघात होण्याची शक्यता वाढली असून, एकीकडे सरकार आरोग्य सेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे एका साध्या हॅलोजन बल्बची दुरुस्ती प्रशासनाकडून केली जात नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. रुग्णालयाच्या इमारतीचा आणि आरोग्याचा डोलारा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रवेशद्वारावरील हा अंधार दिसत नाही का? असा सवाल तालुक्यातील नागरिकांनी विचारला आहे. “प्रशासनाला या मूलभूत सुविधांचे काही देणेघेणे उरले नसल्याची” भावना आता जनसामान्यांमध्ये प्रबळ होत आहे.
केवळ हॅलोजन बल्ब बदलण्यासारख्या किरकोळ कामासाठीही महिनाभर वाट पाहावी लागत असेल, तर गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची काय अवस्था होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी.
पारनेर ग्रामीण रुग्णालयातील ही समस्या तात्काळ मार्गी लावणे गरजेचे आहे. केवळ प्रवेशद्वाराचा उजेडच नव्हे. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर समज देणे आवश्यक आहे.आणि २४ तासांच्या आत प्रवेशद्वारावरील दिवे सुरू करावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.




