पारनेर/प्रतिनिधी :
 तालुक्यातील वडझिरे मंडलातील अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या आठ गावांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. या गावांना ८७.०५ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून, ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांनी ही माहिती दिली.

सुजित झावरे पाटील यांनी गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ही मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या या गावांना भरपाईपासून वंचित राहावे लागले होते, मात्र आता शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.

याशिवाय, कान्हूर पठार आणि पारनेर मंडलातील शेतकऱ्यांच्या १३.१० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा प्रस्तावही लवकरच मंजूर होणार असल्याचे झावरे पाटील यांनी सांगितले. पारनेर तालुक्यात आतापर्यंत विविध मंडलांतील शेतकऱ्यांना ४४.५२ कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.


२०२५ मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले होते. जिल्ह्यात एकूण ८४७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली असून, पारनेरसह इतर तालुक्यांतील शेतकरीही मदतीची वाट पाहत आहेत. सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पाठपुरावा यशस्वी झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


🔶🔶🔶🔶🔶🔶
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दीड महिन्यापासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वडझिरे मंडलातील ८ गावांना ८७.०५ लाखांची भरपाई मंजूर झाली. शेतकरी कष्टकरी समाजाची जाण असलेले नेतृत्व खऱ्या अर्थाने शिंदे साहेब आहेत. पारनेर तालुक्यातील प्रश्नांसंदर्भातही सातत्याने माझा पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून तालुक्याला न्याय मिळत आहे.

शिवसेना नेते सुजित झावरे पाटील
( माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *