पारनेर / भगवान गायकवाड, 
स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि भारतीय युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून पारनेर येथे सावित्री फातिमा सदभावना मंच आयोजित जिजाऊंच्या लेकींचा” वैचारिक जागर ,”हा परिसंवाद मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

       या कार्यक्रमातून जिजाऊंच्या संस्कारांचा आणि विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सोनिया औटी होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्री फातिमा सद्भावना मंचचे कार्याध्यक्ष डॉ. रफिक सय्यद, ॲड. भारती तराळ, शिक्षिका शगुप्ता शेख, मीरा पुजारी, प्रा.तहेनीश शेख, राजेंद्र करंदीकर, शाहूराव औटी, संतोष खोडदे, कारभारी बाबर, संभाजी औटी,प्रकाश नांगरे, संदीप ठाणगे, गणेश भोसले, शैलेंद्र औटी, गौतम साळवे,भाऊसाहेब औटी, भिकाजी जगदाळे,पत्रकार विनोद गायकवाड, पत्रकार श्रीनिवास शिंदे,बाळासाहेब शेटे, सचिन पठारे,सलीम राजे, राजुभाई शेख, अविनाश देशमुख,रोशनी गायकवाड, आकांक्षा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा.शाहूराव औटी यांनी जिजाऊंची वंदना सादर करून केली. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष खोडदे यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी सावित्री फातिमा सदभावना मंचने संत महात्मे , थोर महापुरुष यांच्या समाजाप्रती असलेले मौलिक आदर्श विचार युवा पिढीला तसेच संत महात्म्यांनी केलेल्या समाज कार्याची ओळख व्हावी आणि त्या प्रमाणे योग्य दिशा मिळावी या वैचारिक सोहळ्या मागची भूमिका स्पष्ट केली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सोनिया औटी यांनी राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “जिजाऊंनी केवळ एका पुत्राला जन्म दिला नाही, तर एका महान विचाराला जन्म दिला. त्यांच्या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य घडवू शकले. आजच्या काळातही महिलांनी जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे.

“डॉ. रफिक सय्यद यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केली की, समाजातील काही अपप्रवृत्तीने महापुरुषांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला आहे.त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर येणे महत्त्वाचे आहे तर ॲड. भारती तराळ आणि प्रा.तहेनीश शेख यांनीही आपल्या भाषणातून जिजाऊं, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण विचार मांडले. जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत जो संयम आणि धाडस दाखवले, ते आजही प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थिनींनी मांडलेले वैचारिक विचार. 
रोशनी गायकवाड, आकांक्षा शिंदे, अपूर्वा गाडेकर, श्रावणी पोटे आणि कल्याणी आढाव या जिजाऊंच्या लेकींनी अत्यंत अभ्यासपूर्ण शैलीत आपली मनोगते व्यक्त केली. रोशनी गायकवाड हिने जिजाऊंच्या युद्ध कौशल्यबद्दल आणि महापुरुषांबदल माहिती दिली.आकांक्षा शिंदे हिने जिजाऊ, शिवाजी महाराज यांच्या समवेत मुस्लिम मावळे यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली .इतर विद्यार्थिनींनी जिजाऊंच्या संस्कारांतून घडलेला शिवबा आणि आजच्या युगातील तरुणींची जबाबदारी यावर प्रभावी भाषणे केली. या चिमुकल्या रणरागिणींच्या वक्तृत्वाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमाला पारनेर परिसरातील नागरिक, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून सावित्री फातिमा सद्भावना मंचच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला पुढाकार चर्चेचा विषय ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले तर आभार भाऊसाहेब औटी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *