पारनेर : भगवान गायकवाड,
ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी सैनिक अण्णासाहेब हजारे यांच्या अद्वितीय राष्ट्रसेवेचा आणि सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून, भारतीय संरक्षण मंत्रालय व भारतीय सैन्याच्या वतीने राळेगण सिद्धी गावाला ऐतिहासिक ‘T-55’ रणगाडा कायमस्वरूपी भेट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील असा लष्करी गौरव प्राप्त करणारे राळेगण सिद्धी हे पहिलेच गाव ठरल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हा रणगाडा केवळ युद्धसामग्री नसून, भारतीय सैन्याच्या शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात व बांगलादेश मुक्ती संग्रामात या रणगाड्याने शत्रूला धूळ चारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे, अण्णा हजारे भारतीय सैन्यात कार्यरत असताना याच प्रकारच्या रणगाड्यांचा त्यांनी वापर केला होता. त्यामुळे या भेटीने अण्णांच्या लष्करी कारकिर्दीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.
हा रणगाडा राळेगण सिद्धीमध्ये स्थापित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय व कायदेशीर स्तरावर प्रयत्न सुरू होते. जिल्हा व सत्र न्यायालयाचे नोडल अधिकारी चंद्रकांत शिंदे यांनी या प्रक्रियेत अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांच्यासह लेफ्टनंट जनरल आर. आर. निंबोरकर (निवृत्त) आणि दादा पठारे यांनी संरक्षण मंत्रालय व सैन्य प्रशासनासोबत सातत्याने समन्वय साधला. अनेक तांत्रिक व कायदेशीर अडचणींवर मात करत, या तिघांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक उपक्रम यशस्वी झाला आहे.हा रणगाडा आता गावातील प्रमुख दर्शनीय ठिकाणी स्थापित केला जाणार आहे. यामुळे राळेगण सिद्धीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आणि देशाच्या भावी पिढीसाठी हा रणगाडा राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सैन्याबद्दलच्या आदराचे एक जिवंत प्रेरणास्थान ठरणार आहे.राळेगण सिद्धीच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण मानला जात असून, या ऐतिहासिक कार्यासाठी चंद्रकांत शिंदे, लेफ्टनंट जनरल निंबोरकर आणि दादा पठारे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
माझ्या देशसेवेचा आणि सामाजिक कार्याचा सन्मान भारतीय सैन्याने या रणगाड्याच्या भेटीच्या माध्यमातून केला आहे. याचा मला अभिमान वाटतो. हा रणगाडा युवकांमध्ये राष्ट्रभक्ती आणि सैन्याबद्दल आदर निर्माण करेल.
– अण्णासाहेब हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.




