पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत असल्याने, या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माऊलीशेठ औटी यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, प्रशासनाकडून आंदोलनाची दखल न घेतल्याने, सामाजिक बांधिलकी जपत माऊलीशेठ औटी यांनी स्वतःची खासगी कुपनलिका (बोअरवेल) नागरिकांसाठी २४ तास मोफत खुली करून एक आदर्श निर्माण केला आहे.
या जनहिताच्या उपक्रमाचा शुभारंभ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आमदार दाते यांनी माऊलीशेठ औटी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “पिण्याचे स्वच्छ पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. प्रशासनाने गांभीर्याने घ्यायच्या प्रश्नावर माऊलीशेठ यांनी स्वतःच्या साधनसंपत्तीतून उपाय शोधून माणुसकीचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.”
या उपक्रमामुळे स्थानिक महिला आणि त्रस्त नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. नगरसेवक अशोकशेठ चेडे यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, “नागरिकांनी अनेकदा पाठपुरावा करूनही सत्ताधाऱ्यांनी पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष केले, ही दुर्दैवी बाब आहे. जे काम नगरपंचायतीने करायला हवे होते, ते एका सामाजिक कार्यकर्त्याने करून दाखवले आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.”
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना माऊलीशेठ औटी म्हणाले की, “नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकताना पाहणे मला योग्य वाटले नाही. जोपर्यंत शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत मी नागरिकांच्या पाठीशी ठाम उभा राहीन.”
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतदादा चेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजूशेठ औटी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. माऊलीशेठ औटी यांच्या या लोकहितवादी निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, त्यांच्या या कार्यामुळे समाजातील गरजूंना मोठी मदत झाली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी हा उपक्रम खऱ्या अर्थाने ‘जीवनदायी’ ठरला आहे.




