पारनेर / भगवान गायकवाड,
संत-महापुरुषांच्या महान विचारांची परंपरा आणि संविधान निर्मात्यांच्या उदात्त कार्याची ओळख नवी पिढीतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पारनेर पब्लिक स्कूलने एक स्तुत्य आणि अभिनव उपक्रम राबवला. ‘कीर्तनाची पर्वणी’ या नावाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून राष्ट्रीय समाजप्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला.
पारनेर पब्लिक स्कूल, ज्याला परिसरातील लोक प्रेमाने ‘पारनेर मधील शांतीनिकेतन’ म्हणून ओळखतात, तेथे काल ही संस्कारक्षम पर्वणी संपन्न झाली. कीर्तन केवळ मंदिरात किंवा वयोवृद्धांसाठीच नसते, तर ते विद्यार्थ्यांच्या ज्ञानमंदिरातही व्हावे, ही अभिनव संकल्पना शाळेने प्रत्यक्षात आणली.ह.भ.प. ज्ञानेश्वर वाबळे महाराजांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, संतांची प्रबोधन परंपरा आणि महामानवांचा लोकोत्तर त्याग हीच आपली खरी ‘विरासत’ आहे. आजचे हे विद्यार्थी उद्याचे देशाचे सुजाण नागरिक आहेत, त्यामुळे संविधानकर्त्यांचा ‘नवभारत’ साकारण्यासाठी नव्या युगाच्या या शिलेदारांनी सज्ज असले पाहिजे, असा सांगावा त्यांनी दिला. महाराजांनी शिक्षणाची व्याख्या समजावून सांगताना उपस्थित शेकडो विद्यार्थी आणि गुरुजनांना सांगितले की, शिक्षण म्हणजे संस्कार. जीवनात गुण महत्त्वाचे आहेतच, मात्र त्याहीपेक्षा सदगुण अधिक महत्त्वाचे आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचा संदेश दिला, “तुम्ही डॉक्टर बना, इंजिनियर बना, किंवा कुठल्याही उच्च पदावर जा, पण त्या आधी चांगला माणूस बना.”महाराजांनी छत्रपती शिवरायांपासून ते सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्यापर्यंतचा सारा जाज्वल्य इतिहास आपल्या प्रबोधनपर कीर्तनातून अतिशय प्रभावीपणे विशद केला, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्र आणि समाजसेवेची भावना अधिक दृढ झाली.या कार्यक्रमाला ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. सोपान काका औटी यांची विशेष उपस्थिती होती. तसेच, शाळेतील हजारावर विद्यार्थी, सर्व गुरुजन आणि पारनेर येथील सविता-फातिमा सद्भावना मंचचे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रफिक शेख , ह.भ.प किसनराव पावडे, सचिव भाऊसाहेब औटी, मारुती शेरकर, दत्तात्रय घोडके, शाहूराव औटी, संभाजी औटी,भिकाजी जगदाळे व सहकारी उपस्थित होते.
शाळेचे प्रवर्तक आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या बेटाचे शिल्पकार प्राचार्य श्री गिताराम मस्के यांनी या कीर्तनरूपी सेवेद्वारे इतर शाळा संचालकांना एक विधायक सहशालेय उपक्रमाचा नवा पायंडा घालून दिला आहे. शाळेला आपले सर्वस्व देणाऱ्या गुरुजनांच्या आणि मुख्याध्यापकांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबतच मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व रुजविले जात आहे, हे या उपक्रमातून सिद्ध झाले. पारनेर पब्लिक स्कूलने घेतलेला हा निर्णय शिक्षण क्षेत्रात एक संस्कारमय आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.




