पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर शहरातून जाणाऱ्या पारनेर–सुपा राज्य मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, नुकत्याच झालेल्या पावसामुळे संपूर्ण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानक परिसरापासून सय्यद हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.
पारनेर हे तालुक्याचे प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने या मार्गावरून दररोज हजारो लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा पहिल्याच पावसात उघड झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी खोल खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, लहान-मोठे अपघात वाढले असून दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे.
यशवंत हॉटेल परिसर, बँक ऑफ बडोदा समोरील रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वार, हनुमान मंदिर परिसर, डॉ. सय्यद हॉस्पिटल परिसर, पारनेर ग्रामीण पतसंस्था समोर तसेच ए.डी.सी.सी. बँक चौक या भागांमध्ये रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर विखुरलेली खडी आणि मोठे खड्डे यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याच्या घटनाही घडत आहेत.
वृद्ध नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि रुग्णांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक बनला असून पावसामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे. संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या मार्गाची दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
जनतेच्या सुरक्षिततेसाठी तातडीने दुरुस्ती आवश्यक
“सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पारनेर–सुपा मार्गावरील रस्त्याची झालेली दुरवस्था तात्काळ दूर करून खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात यावी. नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे.”
– किरण सोनवणे, तालुकाध्यक्ष, आरपीआय (निकाळजे गट)




