पारनेर (प्रतिनिधी) –
शासकीय वाहनांना बेकायदेशीरपणे काळ्या काचा व अंबर दिवा लावून नियम धाब्यावर बसवणाऱ्या पारनेरच्या तहसीलदार सौ. गायत्री सौंदाणे आणि प्रांताधिकारी पारनेर-श्रीगोंदा श्री. चिंचणकर यांची तात्काळ बदली करून उच्चस्तरीय चौकशी करावी, अन्यथा आमरण उपोषण करू, असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पारनेर तालुक्याचे अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी दिला आहे.
याबाबत मनसेने दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी विभागीय आयुक्त नाशिक, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी अहिल्यानगर व RTO अहिल्यानगर यांना स्मरणपत्र दिले आहे. या पत्राची पोच जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आहे.
काय आहे प्रकरण ?
मनसेने दि. 04/08/2026 रोजी तक्रार देऊन दोन महिने उलटले तरी कारवाई झालेली नाही. दि. 30/07/2026 रोजी या दोन्ही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 चे उल्लंघन करून शासकीय वाहनांना काळ्या काचा व अंबर दिवा लावल्याचे निदर्शनास आले होते.
विशेष म्हणजे *RTO, अहिल्यानगर यांनी दोन वेळा लेखी आदेश देऊनही* हे अधिकारी अंबर दिवा काढायला तयार नाहीत. हा शासन आदेशाचा उघड अवमान आहे.
करोडोंचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप…
फक्त अंबर दिवाच नाही, तर या अधिकाऱ्यांच्या 2023 ते 2026 या कार्यकाळात सुपा MIDC फेज 1 व 2 मधील शासकीय भूखंडावरील माती, मुरुम व गौण खनिजाचे तसेच सुपा, वाघुंडे, म्हसणे, पळवे, अस्तगाव, रायतळे, बाबुर्डी शिवारात खडी क्रेशरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे.
मनसेच्या तीन ठाम मागण्या :
1. पुरावे नष्ट होण्यापूर्वी दोन्ही अधिकाऱ्यांची पारनेर / श्रीगोंदा येथून *तात्काळ बदली* करावी.
2. अवैध उत्खनन प्रकरणी *विभागीय आयुक्त स्तरावर उच्चस्तरीय चौकशी समिती* नेमावी.
3. चौकशीत दोषी आढळल्यास *तत्काळ निलंबित* करून फौजदारी गुन्हे दाखल करून बुडालेला महसूल व्याजासह वसूल करावा.
8 दिवसांत लेखी खुलासा व कारवाई न झाल्यास जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अविनाश पवार यांनी दिला आहे.




