टंचाई व जलजीवन मिशनच्या कामांचा गावनिहाय आढावा
पारनेर / ता. प्रतिनिधी,
पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघातील सध्याची दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई तसेच जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, पारनेर येथे विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ही विशेष बैठक अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिली.
सध्या मतदारसंघातील विविध गावांमध्ये निर्माण झालेली पाणी व चारा टंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या बैठकीत गावनिहाय पाणी, चारा उपलब्धतेचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे. विशेषतः जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या योजनांचा अद्याप प्रत्यक्ष पाणीपुरवठ्यासाठी वापर का सुरू झालेला नाही, याची कारणे तपासण्यात येणार आहेत.
तसेच ज्या योजना किरकोळ किंवा अल्प प्रमाणात अपूर्ण आहेत, त्या तातडीने पूर्ण करून संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरू करता येईल का, याबाबतही बैठकीत चर्चा केली जाणार आहे. ज्या योजना अद्याप अपूर्ण आहेत, त्या कोणत्या कारणांमुळे रखडल्या आहेत, त्यातील अडचणी कोणत्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा गावनिहाय आढावा घेण्यात येणार असल्याचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी सांगितले.
“पूर्ण झालेल्या योजनांचा लाभ नागरिकांना प्रत्यक्ष मिळणे आवश्यक आहे. केवळ योजना पूर्ण झाल्याची नोंद न राहता त्या योजनांच्या माध्यमातून संबंधित गावांना प्रत्यक्ष पाणी मिळावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर या बैठकीत भर दिला जाणार आहे,” असे आमदार काशिनाथ दाते सर यांनी सांगितले.
या आढावा बैठकीसाठी पारनेर तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी बांधव तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार काशिनाथ दाते सर यांनी केले आहे. दुष्काळी परिस्थितीत पाणीप्रश्नाला प्राधान्य देत जलजीवन मिशनच्या प्रलंबित व अपूर्ण कामांना गती देऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




