पारनेर / ता. प्रतिनिधी,
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी गुरुवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत दादा गायकवाड यांनी बिगरशेती मतदारसंघातून, तर सौ. सोनल गायकवाड यांनी महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी आमदार काशिनाथ दाते सर यांच्यासह प्रशांत गायकवाड व सौ. सोनल गायकवाड उपस्थित होते. यावेळी पारनेर महायुतीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
यावेळी भाजप नेते राहुल पाटील शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, सुधामती कवाद, सुषमा रावडे, अपर्णा खामकर, दिनेश बाबर, अशोक चेडे, पंकज कारखिले, सुभाष दुधाडे, दत्तानाना पवार, सुनील थोरात, विठ्ठल कवाद, बाळासाहेब नरसाळे, तेजस चौधरी, विकास रोहकले, ज्ञानेश्वर औटी, संतोष शेलार, लहू भालेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार काशिनाथ दाते सर यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम मानून पुढील भूमिका राहील, असे स्पष्ट केले. जिल्हा बँक ही शेतकरी आणि सहकार क्षेत्राशी निगडित महत्त्वाची संस्था असल्याने व्यापक हिताचा विचार करून निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या चर्चेलाही त्यांनी दुजोरा दिला.
🔶🔶🔶🔶🔶🔶
◼️ “मी माझ्या समवेत प्रशांत गायकवाड व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सोनल गायकवाड यांचे वेगवेगळ्या मतदारसंघातून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. मात्र, मी महायुतीचा प्रतिनिधी म्हणून ही भूमिका बजावली असून महायुतीच्या घटक पक्षांतील वरिष्ठ नेते जी भूमिका घेतील, ती आम्हा सर्वांना मान्य असेल. संगमनेर येथे दोन-तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विविध पक्षांच्या निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. अहिल्यानगर जिल्हा बँक ही महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक असून, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत त्या बैठकीत सर्वानुमते भूमिका मांडण्यात आली, त्यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते पुढील काळात जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असेल.
– आमदार काशिनाथ दाते सर




