पारनेर / भगवान गायकवाड, 

श्रीमती सुंदराबाई गहिनाजी लंके माध्यमिक व आनंदीबाई नारायण एरंडे उच्च माध्यमिक विद्यालय, वडझिरे येथे नुकताच शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने शालेय प्रगतीचा आढावा घेण्यासह गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ध्येयावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी इयत्ता आठवीतील एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी आणि इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाने पालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

मेळाव्यात विद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांचा उहापोह करण्यात आला. संदीप शिंदे यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती दिली, तर मोनाली राहणे यांनी विद्यालयाच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘गुरुकुल प्रकल्पा’वर प्रकाश टाकला. स्पर्धा परीक्षांच्या युगात विद्यार्थ्यांची तयारी कशी असावी, याचे मार्गदर्शन प्रमोद रोहोकले यांनी केले. तसेच अश्विनी काळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत पालकांची भूमिका आणि जबाबदारी यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याशिवाय, इन्स्पायर अवॉर्ड आणि रयत ऑलिंपियाड यांसारख्या उपक्रमांची माहिती प्रणव वाळुंज यांनी दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिवाजीराव औटी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालक यांच्यातील समन्वय हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. दोघांच्या परस्पर सहकार्यातूनच विद्यार्थी उद्याचे सक्षम नागरिक बनू शकतात.” अध्यक्षीय भाषणात शिवाजी आप्पा मोरे यांनी पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रगतीसाठी शाळेच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.
विद्यालयाचे प्राचार्य बाबाजी राऊत यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ग्वाही दिली. ते म्हणाले की, “आमचे विद्यालय प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे.”

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादू शेठ तोडकर, उपाध्यक्ष युवराज शेठ मोरे, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार मोरे, माजी रयत सेवक हरिभाऊ चौधरी, माजी विद्यार्थी रोहिदास लंके यांच्यासह पालकांची मोठी उपस्थिती होती. पालक प्रतिनिधी युवराज शेठ मोरे व दत्ता गाडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रूपाली भांड यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. मेळाव्यामुळे शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *