विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

पारनेर / ता. प्रतिनिधी  
पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या दीड वर्षांत सुमारे २० ते २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून विविध विकासकामे मार्गी लावली असून, आगामी काळातही पारनेरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी दिली. पारनेर नगरपंचायत हद्दीतील १ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या स्ट्रिटलाईट प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी आमदार दाते यांनी पारनेर शहराच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेताना सांगितले की, आमदार झाल्यानंतर दिवंगत नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांनी पारनेर शहराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. नगरसेवक अशोक चेडे, पैलवान युवराज पठारे, राजू औटी यांच्यासह अनेकांच्या मागणीनुसार हा निधी शहरातील विविध विकासकामांवर खर्च करण्यात आला. त्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या ‘नमो उद्यान’ योजनेसाठी १ कोटी रुपयांचा निधी पारनेरसाठी मंजूर केला आहे. 

पारनेर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असले तरी शहराच्या मूलभूत सुविधांची अवस्था एका खेडेगावापेक्षाही वेगळी नव्हती. त्यामुळे पारनेर शहर आधुनिक आणि आकर्षक स्वरूपात विकसित करण्याचा निर्धार आपण केला असल्याचे सांगताना आमदार दाते म्हणाले शहराकडे येणाऱ्या सहा प्रमुख मार्गांवर १ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीतून स्ट्रिटलाईट बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुपा व अळकुटीकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे सुरू असून संबंधित एजन्सीकडे या मार्गांवरही स्ट्रिटलाईटची सुविधा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच शहरातील सर्वच प्रमुख रस्ते प्रकाशमान होणार आहेत.

पारनेर शहरातील स्मशानभूमीमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि शेड उभारण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून उर्वरित कामांसाठी ३० लाख रुपयांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरातील पेठेचा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाल्याने त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भविष्यात या मार्गावर पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता दर्जेदार पद्धतीने विकसित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बुगेवाडी परिसरातील नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध रस्त्यांच्या मागण्यांबाबत बोलताना आमदार दाते म्हणाले की, या सर्व कामांना यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून केवळ निविदा प्रक्रिया शिल्लक आहे. ती पूर्ण होताच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीत पारनेरकरांनी मोठ्या मताधिक्याने आपल्यावर दाखविलेला विश्वास आपण विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र गेल्या दीड वर्षांत नगरपंचायतीत आपल्या विचारांचे पदाधिकारी सत्तेत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

यापुढील काळात राजकीय मतभेद आणि वैयक्तिक वाद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगताना आमदार दाते म्हणाले की, पारनेर शहराचा सर्वांगीण विकास हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा विषय नसून तो सर्वांचा सामूहिक संकल्प आहे. सर्वांनी हातात हात घालून काम केल्यास पारनेरला आधुनिक, सुशोभित आणि सर्व सुविधांनी युक्त शहर बनविणे अशक्य नाही. विकासाच्या या प्रवासात सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हा परिषदचे माजी सदस्य वसंतराव चेडे, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, माजी उपनगराध्यक्ष दत्ता शेठ कुलट, नगरसेवक अशोक चेडे, माऊली औटी, राजू शेठ औटी, सुनील गाडगे, युवराज पठारे, भाऊ ठुबे, कांतीलाल ठाणगे, शिवाजी जाधव, बाळासाहेब औटी, विठ्ठल कावरे, शामा औटी सर, कैलास गुंजाळ, सिद्धांत देशमाने, अभिजीत नाईक, शेषमल बोरा, अनिल भंडारी, संतोष गांधी, मच्छिंद्र गायकवाड साहेब, शेटे महाराज, सुनील चौगुले, रामदास दाते, प्रदीप नगरे, शांताराम तराळ, देवा ठाणगे, भास्कर डोंगरे, बबन शिंदे, अर्जुन शिंदे, गोरख शिंदे, दुर्गाजी शिंदे, मच्छिंद्र शिंदे, करण शिंदे, अविनाश शिंदे, तुषार शिंदे, सुभाष घोडके, स्वप्निल औटी, सचिन औटी, परेश औटी, विठ्ठल औटी, अनुराधा पवळे, सुनिता सोबले, जयश्री शेरकर, रंजना शेरकर, उज्वला इधाटे, नीलम गोसावी, स्वप्नाली शेळके, सारिका सोनवणे, गायत्री सोनवणे, कमल इधाटे आदी मान्यवर ग्रामस्थांसह स्थानिक नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *