पारनेर / भगवान गायकवाड, 
    फेब्रुवारी महिना संपत आला की सूर्याचा दाह वाढू लागतो आणि या रणरणत्या उन्हात केवळ माणसांचीच नव्हे, तर मुक्या प्राण्यांचीही दैना होते. जंगल परिसरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने तहानलेल्या हरिण, ससे, मोर आणि लांडोर , कोल्हे, लहान मोठे पशु, पक्षी यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. हीच सामाजिक जाणीव ओळखून पारनेर तालुका पत्रकार संघाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘वन्यजीवांसाठी घोटभर पाणी’ हा स्तुत्य उपक्रम तीन महिने हाती घेतला आहे.

शनिवार, दि. १४ रोजी शहांजापूर परिसरातील वनविभागाच्या पाणवठ्यात मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमासाठी पारनेरमधील प्रसिद्ध उद्योजक, यश उद्योग समूहाचे दिपक नाईक यांनी पुढाकार घेत सामाजिक भावनेतून टँकरद्वारे पाण्याची सोय केली. केवळ बातमीदारी न करता समाजाचे देणे लागतो, या भावनेतून पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्याचे तीन महिने हा यज्ञ राबवत आहे.

या प्रसंगी शिवराय सामाजिक प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद गोळे यांनी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “शहांजापूरसारख्या डोंगराळ भागात वन्यजीवांना पाण्याची मोठी समस्या असते. पत्रकार संघाने या पाणवठ्यात पाणी साठवून एका अर्थाने या जीवांना जीवनदान दिले आहे.” तसेच, नागरिकांनी आपले वाढदिवस किंवा आप्तेष्टांच्या स्मृती प्रित्यर्थ अशा उपक्रमांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार आणि सोशल वर्कर भगवान गायकवाड यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “माणूस आपली तहान कुठेही भागवू शकतो, पण जंगलातील प्राण्यांनी कोणाकडे जायचे? हीच भावनिकता ठेवून आम्ही दरवर्षी तालुक्यातील जंगल परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी हे पाणवठे पाण्याने भरण्याचे काम करतो.”

उद्योजक दीपक नाईक यांनी या उपक्रमाची पाठराखण करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ‘दैनिक नवरात्र’चे सुभाष दिवटे, ‘दैनिक सार्वमत’चे सुरेंद्र शिंदे आणि इतर सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाला तालुक्यातील विविध सामाजिक, धार्मिक संस्था आणि उद्योजकांचे नेहमीच सहकार्य लाभते.


 जेव्हा माणूस स्वतःच्या गरजांपलीकडे जाऊन निसर्गाचा विचार करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने माणुसकी जिवंत राहते. पारनेरच्या पत्रकारांनी लेखणीसोबतच ही सामाजिक जबाबदारी पेलून सर्वांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.

– पत्रकार विनोद गोळे,
अध्यक्ष, शिवराय सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *