ग्रामसेवक, सरपंच व इंजिनिअरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
पारनेर / प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ गावात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत सन २०२२-२३ मध्ये मंजूर झालेल्या विजपुरवठा कामांमध्ये सुमारे पाच लाख रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप राळेगण थेरपाळ येथील सतिश उर्फ बाजीराव कारखिले, किरण भ. कारखिले, किरण बा. कारखिले, यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केला आहे.
तुषार अभिमान साठे या एल-१ कंत्राटदाराने काम पूर्ण केले तरी पैसे दुसऱ्या ‘श्री. इंडस्ट्रीज हंगा’ या एजन्सीला दिल्याचा आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सतिश उर्फ बाजीराव कारखिले व सहकाऱ्यांनी १३ मार्च २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, गावठाण, हरिजनवस्ती, सिद्धार्थनगर येथे एक लाख तर मातंग वस्ती, वस्ताद लहुजीनगर येथे चार लाख असे दोन विजपुरवठा कामे मंजूर झाली होती. निविदेत तुषार अभिमान साठे एल-१, आकाश प्रकाश काळे एल-२ व रामदास विष्णु तांबे एल-३ हे निविदा प्रक्रियेत होते. ग्रामसेवक बबन आढाव व तत्कालीन सरपंच पंकज कारखिले यांनी तुषार साठे यांना कार्यारंभ आदेश व वर्क ऑर्डर दिली. पारनेर पंचायत समितीच्या विभागीय अभियंत्यांनी मोजमाप (एम.बी.) तयार केले. उपअभियंता जिल्हा परिषद यांच्या सहीने एम.बी. पारित झाले. तुषार साठे यांनी शासकीय निकषानुसार काम पूर्ण करून फॉर्म ६५ नुसार पूर्णत्वाचा दाखला सादर केला.
परंतु ग्रामपंचायतीने तुषार साठे यांना एक पैसाही न देता. त्याच कामाचे परत मोजमाप करून श्री इंडस्ट्रीज हंगा या एजन्सीच्या नावाने पुन्हा एम बी तयार करून फॉर्म 65 नुसार पूर्णत्वाचा दाखला दिला व खात्यावर पैसे वर्ग केले. तुषार साठे यांनी २९ ऑगस्ट २०२४ रोजी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी वरील प्रकरणाची चौकशी केल्यानंतर या प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आली. त्यामुळे ग्रामसेवक यांना कागदोपत्री कुठलाही बदल करण्यात येऊ नये म्हणून तात्काळ निलंबित करण्यात यावे असे अहवालामध्ये नमूद केले. तो अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून निलंबनाच्या कारवाईची मागणी चौकशी अधिकाऱ्यांनी केली आहे.
अर्जदाराने पुढे म्हटले की, ग्रामपंचायतीने एल-२ व एल-३ कंत्राटदारांना न देता नियमबाह्य पद्धतीने ‘श्री. इंडस्ट्रीज हंगा’ला काम दिले. तुषार साठे यांच्या नावाने बनावट पत्र, बनावट शिक्का व सही वापरली. एम.बी. पुस्तिका ‘श्री. इंडस्ट्रीज हंगा’च्या नावाने तयार करून त्याच नावाने बिल काढले व धनादेश दिला. बँक खाते उतारा देखील जोडला आहे. महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा विभागाकडून विद्युत जोडणीसाठीही बनावट दाखला घेतला.
या प्रकरणात ग्रामसेवक बबन आढाव, तत्कालीन सरपंच पंकज कारखिले, विभागीय इंजिनियर जिल्हा परिषद अहिल्यानगर, उपअभियंता पारनेर यांचा समावेश असल्याचा आरोप आहे. सतिश उर्फ बाजीराव कारखिले यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, विशेष चौकशी करून सर्व संबंधितांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. ग्रामपंचायतीत इतर कामांमध्येही असेच अपहार झाले असतील याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही केली आहे.
या आरोपांमुळे जिल्हा परिषद स्तरावर खळबळ उडाली असून लवकरच उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ग्रामस्थांमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
हा केवळ एका कामाचा प्रश्न नसून, शासकीय पैशांची पद्धतशीर लूट आहे. बनावट स्वाक्षऱ्या आणि कागदपत्रांच्या आधारे हा सामूहिक अपहार झाला आहे. जर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली नाही, तर शासनाचा निधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारच नाही. ग्रामसेवक सरपंच व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
— सतिश उर्फ बाजीराव कारखिले (ग्रामपंचायत सदस्य, राळेगण थेरपाळ)
🔶🔶🔶🔶🔶
सरपंच पंकज कारखिले यांनी गेल्या सहा वर्षांमध्ये राळेगण थेरपाळ येथे विकासाची अनेक कामे मार्गी लावली अशी तालुक्यात दवंडी पिटविली त्यामुळे राळेगण थेरपाळ हे विकासाचे मॉडेल होईल असे वाटत होते परंतु ते आता भ्रष्टाचाराचे मॉडेल झाल्याचे दिसून येत आहे. गावातील अनेक विकास कामांमध्ये अनियमितता दिसून येत असून या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे.
– किरण भ. कारखिले (ग्रामपंचायत सदस्य, राळेगण थेरपाळ)
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
राळेगण थेरपाळ ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्तीसाठी असलेला १५ टक्के निधी खर्च करण्यात यावा ही वारंवार मागणी करूनही कुठल्याही प्रकारे सरपंच व ग्रामसेवक यांनी सहमती न दाखवत निधी खर्च केला नाही. या निधीमध्ये सुद्धा अनियमितता असू शकते त्यामुळे याची सुद्धा सखोल चौकशी व्हावी.
– किरण बा. कारखिले (ग्रामपंचायत सदस्य, राळेगण थेरपाळ)




