‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उद्घाटन

पारनेर /  प्रतिनिधी, 
ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी व शासनाच्या विविध योजनांबाबतची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी खडकवाडी ता. पारनेर येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ कार्यक्रमाचे उद्घाटन पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी महसूल विभागासह कृषी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, आरोग्य, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालविकास, महावितरण, अन्न व नागरी पुरवठा, परिवहन (एस.टी.), शिक्षण तसेच इतर विविध शासकीय विभागांची माहिती देणारे स्वतंत्र टेबल लावण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी आपल्या शंकांचे निरसन करून विविध कामे मार्गी लावून घ्यावीत, असे आवाहन आमदार दाते सरांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या दृष्टीने महसूल विभाग अत्यंत महत्त्वाचा असून तहसीलदारांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या महसूल विषयक योजनांची सविस्तर माहिती देऊन त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करावे. महसूल प्रशासनाचे बहुतांश काम ऑनलाईन झाले असले तरी सातबारा नोंद, फेरफार आदी बाबतीत अनेक तक्रारी येतात. अशा तक्रारींवर या अभियानाच्या माध्यमातून महसूल प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

राज्याचे माजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी प्रभावी कामगिरी केली असून विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यात मोलाची भर घातल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना राबविण्यात आल्या असून नागरिकांनी या अभियानाच्या माध्यमातून त्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

कृषी विभागाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या कार्यकाळात विभागाच्या कामकाजाला मोठी गती मिळाली आहे. पारनेर तालुक्यात मागील दोन महिन्यांत तब्बल ७५० ट्रॅक्टरचे अनुदानावर वितरण करण्यात आले असून इतर कृषी अवजारांचेही मोठ्या प्रमाणावर वाटप झाले आहे. कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. दाते यांनी केले.

यावेळी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीने दिलेला शब्द पूर्ण केल्याचेही आमदार दाते यांनी सांगितले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वाढवण्याची गरज असल्याची बाबही माझ्यासह अनेक आमदारांनी अधिवेशनात मांडल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या विविध लोकोपयोगी योजनांचा उल्लेख करत ज्यांना शक्य आहे त्यांनी एस.टी. प्रवासाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाली असून उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 ग्लोबल वार्मिंगमुळे पावसाच्या अनियमिततेचा शेतीवर मोठा परिणाम होत असून पाण्याचे व पीक नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी व शेती अधिक समृद्ध व्हावी यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा योजना, सूक्ष्म सिंचन (ठिबक-तुषार) योजना, कृषी यंत्रीकरण, मृदा आरोग्य पत्रिका, फलोत्पादन विकास, शेतकरी सानुग्रह अनुदान अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. आमदार काशिनाथ दाते सरांच्या माध्यमातून मागील वर्षात शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेतून तालुक्यातील शेतकऱ्यांना पाऊणे दोन कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आली आहे. तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, त्यासाठी विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

– गजानन घुले (तालुका कृषी अधिकारी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *