“विकासाच्या वाटचालीत आणखी एक पाऊल”
पारनेर / प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील क्रीडाप्रेमी युवकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तालुक्यात आधुनिक सुविधांनी युक्त क्रीडा संकुल उभारण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या क्रीडा संकुलासाठी सुमारे ३०२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुर्वी १०० लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून आता ४ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती आ. दाते यांनी दिली.
याबाबत बोलताना आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले की, “पारनेर तालुक्यातील युवकांमध्ये क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळविण्याची प्रचंड क्षमता आहे. मात्र योग्य सुविधा आणि प्रशिक्षणाच्या अभावामुळे अनेक खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळत नव्हती. त्यामुळे क्रीडा समिती तयार झाल्याबरोबर लगेच तालुक्यात असलेल्या क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मांडला होता. शासनाने त्यास मान्यता दिल्याने तालुक्यातील युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या क्रीडा संकुलामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळून भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर पारनेर तालुक्याचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडतील, असा विश्वास आहे.”
आ. दाते म्हणाले, “क्रीडा क्षेत्राला चालना देणे ही काळाची गरज आहे. युवकांना क्रीडा आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळविण्यासाठी अशा सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पारनेर तालुक्यात क्रीडा विकासासाठी पुढील काळातही आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील.”
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित क्रीडा संकुलामध्ये अत्याधुनिक इनडोअर हॉल, विविध क्रीडा प्रकारांसाठी मैदाने, व्यायामशाळा, योगा हॉल, स्वच्छतागृह तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यातील युवकांना आधुनिक आणि दर्जेदार क्रीडा सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. क्रीडा संकुल उभारण्यास मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री व पालकमंत्री यांचे तालुक्यातील जनतेच्या वतीने खुप आभार!
आमदार दाते सर यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने तालुक्यातील युवक, क्रीडाप्रेमी आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या क्रीडा संकुलाच्या उभारणीमुळे पारनेर तालुक्यातील युवकांना विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण घेण्यासाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. स्थानिक पातळीवर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासही चालना मिळणार असून ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे तालुक्यात क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तालुक्यातील क्रीडाप्रेमी युवक, क्रीडा संघटना तसेच ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले असून आमदार दाते यांच्या प्रयत्नांमुळे पारनेर तालुक्याच्या क्रीडा विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.




