पारनेर / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐश्वर्या होनमोरे-शिंदे यांना आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न व महारोग्य सन्मान २०२६’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट, निष्ठावान व सेवाभावी कार्याची दखल घेत हा सन्मान राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी खडकवाडी येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ कार्यक्रमात डॉ. होनमोरे-शिंदे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना आमदार दाते म्हणाले की, यापूर्वी या आरोग्य केंद्राबाबत नागरिकांकडून वैद्यकीय सेवेविषयी तक्रारी येत असत. मात्र डॉ. होनमोरे-शिंदे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर परिस्थितीत सकारात्मक बदल झाला असून रुग्णसेवा अधिक प्रभावी व विश्वासार्ह झाली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेऊन मिळालेला हा पुरस्कार संपूर्ण मतदारसंघासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी अशा कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याचे नमूद करत आमदार दाते यांनी मतदारसंघातील इतर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातील नागरिकांनीही आनंद व्यक्त करत अभिनंदन केले.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देणे हेच आपले कर्तव्य असून या कार्याची दखल घेत आमदार दाते सरांनी केलेला सन्मान हा अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. पुढील काळातही खडकवाडी परिसरातील नागरिकांना अधिक चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध राहिल.
– डॉ. ऐश्वर्या होनमोरे-शिंदे (वैद्यकीय अधिकारी, खडकवाडी)




