पारनेर / भगवान गायकवाड, 
      गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रांधे येथील विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ च्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. पाबळ येथे पार पडलेल्या या स्पर्धेत रांधे शाळेने जवळजवळ सर्वच गटांत प्रथम क्रमांक पटकावून आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवली असून, रांधे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

     शुद्ध आणि वळणदार अक्षराच्या जोरावर हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गटात चैतन्य रविंद्र चौधरी, बाल गटात मोहमदसाद शौकत शेख, किशोर गटात साई गणेश आवारी आणि कुमार गटात प्रतिक मच्छिंद्र लामखडे यांनी प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले.

वक्तृत्व स्पर्धेतही रांधेच्या वाघांनी आपली छाप पाडली. बाल गटात आरोही गणेश आवारी, किशोर गटात राजश्री संपत काटे आणि कुमार गटात ईश्वरी महेश आवारी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर किलबिल गटात गंधर्व अमोल दळवी याने द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.

सांस्कृतिक आणि कला अविष्कार
कथाकथन स्पर्धेत आपल्या ओघवत्या शैलीने साई गणेश आवारी (किशोर गट) आणि ईश्वरी महेश आवारी (कुमार गट) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वेशभूषा स्पर्धेतही रांधे शाळेचे विद्यार्थी आघाडीवर राहिले. यामध्ये ईश्वरी श्रीहरी आवारी, आराध्या संतोष काटे, तन्वी अनिल भोसले आणि आरती संतोष आवारी यांनी आपापल्या वयोगटात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
गायन आणि सांस्कृतिक स्पर्धेत शाळेने निर्विवाद यश मिळवले. वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत चैतन्य रविंद्र चौधरी, राजवीर अनिल आवारी, यशराज संतोष आवारी आणि ईश्वरी महेश आवारी यांनी प्रथम क्रमांक पटकावले. विशेष म्हणजे, समूहगीत गायन आणि सांस्कृतिक स्पर्धेत रांधे शाळेच्या लहान व मोठ्या अशा दोन्ही गटांनी प्रथम क्रमांक मिळवून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

यशाचे गमक आणि अभिनंदन
विद्यार्थ्यांची प्रचंड जिद्द, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अहोरात्र परिश्रम आणि रांधे ग्रामस्थांचे खंबीर पाठबळ यामुळेच हे यश शक्य झाले आहे. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच रांधे गावाचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक करण्यात आले.आमच्या शाळेतील मुलांमध्ये अफाट सुप्त गुण आहेत, त्यांना फक्त वाव देण्याचे काम आम्ही केले. या यशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे,” अशी भावना शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केली.

सध्या संपूर्ण तालुक्यात आणि शैक्षणिक वर्तुळात रांधे जिल्हा परिषद शाळेच्या या यशाची चर्चा होत असून, सर्व स्तरातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *