पारनेर / भगवान गायकवाड, 
महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत आणि ‘प्रती जेजुरी’ म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या, महाराष्ट्र शासनाच्या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कोरठणगड (ता. पारनेर) येथील कुलदैवत श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा यंदा ३ जानेवारी ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीचा आणि जनजागृतीचा भाग म्हणून रविवारी, २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील कामोठे येथे भव्य ‘तळी-भंडार’ व ‘हळदी-कुंकू’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपळगाव रोठा पंचक्रोशीतील या पावन गडावर दरवर्षीप्रमाणे यंदाही खंडोबा देवाचा यात्रा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होईल. शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ पासून या सोहळ्याला प्रारंभ होणार असून सोमवार, दि. ५ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये पालखी सोहळा, अभिषेक, छबिना आणि देवाच्या सासनकाठ्यांचे आगमन हे मुख्य आकर्षण असेल.
नवी मुंबईत भक्तिमय सोहळ्याचे आयोजन आगामी मुख्य यात्रा महोत्सव शिस्तबद्ध आणि निर्विघ्नपणे पार पडावा, या उद्देशाने मुंबई-पुणे येथील भाविकांना एकत्र आणण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी मुंबईत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 स्थळ: साई मिरॅकल सोसायटी हॉल, कामोठे, नवी मुंबई. वेळ: रविवार, २१ डिसेंबर २०२५, सकाळी १०.३० वाजता.

या कार्यक्रमात देवाचा पारंपरिक तळी-भंडार विधी पार पडणार असून, माता-भगिनींसाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला आहे. ‘जय जय खंडेराया मल्हारी…’ च्या जयघोषात हा सोहळा संपन्न होईल. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या मंगलमय सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यामध्ये  पनवेलचे आमदार मा. बाळाराम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (कामोठे)  विमलताई बिडवे, महानगर बँकेच्या अध्यक्षा श्रीमती गीतांजलीताई शेळके ,महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन उपसचिव सुदामजी आंधळे देवस्थानचे माजी अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड यांच्यासह माजी नगरसेविका लीनाताई गरड, मनसेचे योगेश चिले, हॅप्पी सिंग, रामदासशेठ शिंदे, विकास घरत, प्रदीप भगत, अॅड. समाधान काशीद, किसनराव पावडे आणि सुवर्णा वाळुंज यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.कोरठणगड देवस्थानचे मानकरी, शिवभक्त आणि मुंबई-पुणे येथील ग्रामस्थ या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. पिंपळगाव रोठा गावाचे उपसरपंच श्री महादेवशेठ पुंडे, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट, शिवमल्हार सेवाभावी संस्था आणि मुंबईकर ग्रामस्थ मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व भाविक भक्तांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

भंडारा-खोबऱ्याची उधळण आणि “येळकोट येळकोट घेरी मल्हार”च्या जयघोषाने नवी मुंबईतील कामोठे परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *